अकोट आठवडी बाजारात घनकचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे व्यापारी व नागरिक त्रस्त. 15.15 लाखांच्या ठेक्यानंतरही स्वच्छतेचा अभाव असल्याने वसुली ठप्प, ठेकेदाराची मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार.
अकोट शहरातील आठवडी बाजार सध्या घनकचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या समस्येने ग्रासला असून व्यापारी, ग्राहक आणि वसुली ठेकेदार यांच्यात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
अकोट हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून परिसरातील शेकडो गावांतील नागरिक दर आठवड्याला बाजारासाठी येथे येतात. शहराची सुमारे दोन लाख लोकसंख्या आणि ग्रामीण भागातील मोठी वर्दळ लक्षात घेता बाजाराची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र बाजार परिसरात कचऱ्याचे ढीग, सांडपाणी आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Related News
स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजारातील अस्वच्छतेमुळे ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागत असून व्यवसायावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. विशेषतः मटन मार्केट आणि भाजीपाला विभागात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात आला होता. संबंधित ठेकेदाराने तब्बल 15 लाख 15 हजार रुपयांची बोली लावून वसुलीचा ठेका घेतला. मात्र बाजारातील अस्वच्छता आणि पालिकेच्या कथित दुर्लक्षामुळे व्यापाऱ्यांनी बैठक फी भरण्यास नकार दिला आहे. “जोपर्यंत बाजाराची योग्य साफसफाई होत नाही, तोपर्यंत फी देणार नाही,” अशी भूमिका अनेक व्यापाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर आठवडी बाजाराचे वसुली ठेकेदार विनोद अंबादास अढाऊ यांनी 8 जून रोजी मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत बाजारातील कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, अपुरी साफसफाई आणि नगर परिषदेच्या निष्क्रियतेचा उल्लेख करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अनेक वेळा कर्मचाऱ्यांना कचरा उचलण्याबाबत सांगूनही कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी व्यापारी बैठक फी भरण्यास नकार देत असून वादाचे प्रसंगही निर्माण होत आहेत. शहरातील नागरिक भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी याच बाजारातून करत असल्याने अस्वच्छतेचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे.
नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाने तातडीने बाजार परिसरातील कचरा हटवून स्वच्छता मोहीम राबवावी, चिखलयुक्त भागात मुरूम टाकावा आणि सांडपाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी केली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर अकोटमधील ही परिस्थिती चिंताजनक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
आरोग्य निरीक्षकांची प्रतिक्रिया
नगर परिषद अकोटचे आरोग्य निरीक्षक अक्षय फडतरे यांनी सांगितले की, “आठवडी बाजारातील मांस, मासे आणि भाजीपाला विक्रेत्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. बाजारात घाण किंवा कचरा आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”
