सन्मानाचे फुगे, पण वास्तव भयावह – रुग्णालय प्रशासनावर संशय

रुग्णालय

शरद शेगोकार

अकोला : आरोग्य विभागाच्या नोव्हेंबर महिन्यातील निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक पटकावून यश मिळवलेल्या अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थिती मात्र धक्कादायक आणि भयावह आहे. जनतेला आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असतानाही, या रुग्णालयातील महिला रुग्ण आणि त्यांच्या बाळांचा जीव अक्षरशः अंधारात धोक्यात टाकला जात असल्याचे वास्तव उघड झाले आहे.४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२३ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. अजिंक्य भारत टीमने प्रत्यक्ष पाहणी केली असता, काही क्षणांतच रुग्णालयातील बहुतांश वॉर्ड अंधारात बुडाले. फक्त एसएनसीयू (जन्मजात कमजोर बाळांसाठी असलेले विशेष युनिट) येथेच वीजपुरवठा सुरू होता, तर उर्वरित सर्व वॉर्डमध्ये तब्बल २० मिनिटे रुग्ण व नातेवाईक अंधारात थांबले होते.दररोज अकोला जिल्ह्यासह शेजारील तालुक्यांमधून तसेच ग्रामीण भागातून गरोदर महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल होतात. अशा वेळी पाच मिनिटेसुद्धा वीजपुरवठा खंडित राहणे म्हणजे आई-बाळाचा जीव धोक्यात आणणे, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. मात्र अशा गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने डोळेझाक केली असून, फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.आम्ही इथे सहा दिवसांपासून आहोत. दिवसातून दोन-तीन वेळा लाईट जाते. त्यावेळी संपूर्ण वॉर्ड अंधारात असतो. भीतीमुळे कोणी तक्रार करत नाही,असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.विशेष म्हणजे, रुग्णालयात चार इन्व्हर्टर असूनही ते सुरू नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान स्पष्ट झाले. वीज विभागातील तांत्रिक सहाय्यकांनी, एक इन्व्हर्टर बंद असून उर्वरित तीन सुरू आहेत,असा दावा केला. मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान तीन्ही इन्व्हर्टर बंद असल्याचे उघड झाले.या गंभीर मुद्द्यावर तांत्रिक सहाय्यक वाघ यांना विचारले असता, त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर न देता फक्त काम सुरू आहे, एवढेच सांगितले. एवढ्या संवेदनशील विषयावर अशा प्रकारची उदासीन प्रतिक्रिया देणे म्हणजे रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ, असा संताप नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी जबाबदारी न घेता अधिकाऱ्यांनी हात झटकण्याचा हा बेजबाबदार कारभार पाहून नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे.निर्देशांक मूल्यांकनात प्रथम क्रमांक मिळवून सन्मानाचे फुगे फुगवले जात असताना, प्रत्यक्षात वॉर्ड अंधारात बुडालेले असणे आणि मूलभूत सोयीसुविधा न मिळणे यामुळे हा क्रमांक नेमका कशाच्या आधारावर मिळाला, हा मोठा प्रश्न आहे.या प्रकाराची तात्काळ चौकशी करून आरोग्यमंत्री यांनी थेट हस्तक्षेप करावा आणि दोषींना जबाबदारीची जाणीव करून द्यावी, अशी ठाम मागणी जनतेतून होत आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/deputy-chief-minister-ajit-pavarasokbatcha-suit/

Related News

Related News