दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी त्वरित द्या, अन्यथा ग्रामपंचायतीला कुलूप – लोहारा ग्रामस्थांचा इशारा

दिव्यांगांसाठी

बाळापूर  : लोहारा (ता. बाळापूर) येथील ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तात्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा येत्या मासिक सभेच्या दिवशी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे. यासंदर्भात दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी (पंचायत), बाळापूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनानुसार, लोहारा ग्रामपंचायतीअंतर्गत दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी गेल्या पाच वर्षांपासून वाटप करण्यात आलेला नाही. याबाबत वेळोवेळी तोंडी तसेच लेखी अर्ज करूनही ग्रामपंचायत सचिव व सरपंचांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. निधी मिळत नसल्यामुळे दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनातील अडचणींना सामोरे जावे लागत असून शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा रोष व्यक्त करण्यात आला आहे.

या निधीच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मासिक सभेदरम्यान दिव्यांग बांधव आक्रमक झाले होते. मात्र, त्या वेळी ग्रामपंचायत अधिकारी कोणतीही ठोस भूमिका न मांडता सभास्थळ सोडून निघून गेले होते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आजारपणाचे कारण पुढे करून संबंधित अधिकारी पुन्हा रुजू झाले नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Related News

दिव्यांग बांधवांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. याबाबत विस्तार अधिकारी (पंचायत) गंगाधर गुंडेकर यांनी सांगितले की, दिव्यांगांना पाच वर्षांपासून निधी मिळाल्याची तक्रार प्राप्त झाली असून संबंधित ग्रामपंचायतीला निधी वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. तर प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. भराळे यांनी, नोव्हेंबर महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर बँक खाते बदलण्याची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच लवकरच दिव्यांग बांधवांना निधी वितरित करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत जमा झालेला लाखो रुपयांचा करनिधी नेमका कुठे खर्च झाला, गावात कोणती विकासकामे करण्यात आली, याबाबत ग्रामपंचायतीकडून अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या निधीच्या वापराबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

काशिनाथ ढले, रब्बानी देशमुख, आबेद पटेल, निसार देशमुख, सुरेश गुलाब वानखडे, अरमान फकिरा पटेल, अमोल शिवहरी बकाल, रहीम जब्बार देशमुख, नासिर मुजिब अतिक, बाप्पू व आईशा पटेल यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांनी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. प्रशासनाने वेळीच सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा ठाम इशारा दिव्यांग बांधवांनी दिला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/spotify-300tb-data-leak-episode-annas-archive-stole-8-6-crore-songs-digital-security-big-push/

Related News