हिदायत पटेल यांच्या निवासस्थानी राज्यसभा खासदार व आमदारांची भेट; कुटुंबीयांचे सांत्वन, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा

हिदायत पटेल

अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील मोहाळा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण अकोट तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर राजकीय, सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज्यसभा खासदार तसेच अल्पसंख्याक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी आणि अकोल्याचे आमदार साजिदखान पठाण यांनी मोहाळा गावात जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून दुःखात सहभागी होत धीर दिला.

खासदार इम्रान प्रतापगढी यांनी हिदायत पटेल यांच्या हत्येचा तीव्र निषेध करताना ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, लोकशाही मूल्ये, सामाजिक सलोखा आणि राजकीय संस्कृतीवरचा आघात असल्याचे नमूद केले. “हिदायत पटेल हे शांत, अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व होते. त्यांच्या हत्येमुळे काँग्रेस पक्षासह संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.

Related News

या भेटीदरम्यान खासदार इम्रान प्रतापगढी यांनी हत्येच्या तपासाबाबत अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तपासाची सद्यस्थिती, पुरावे संकलन, संशयितांची चौकशी आणि पुढील कारवाई याबाबत त्यांनी माहिती घेतली. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, तसेच तपासात कसलीही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार साजिदखान पठाण यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “हिदायत पटेल यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रशांत पाचडे, बाळासाहेब बोंद्रे, गजानन डाफे, अनोख रहाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. गावकऱ्यांनीही या हत्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली.

हिदायत पटेल हे अकोट तालुक्यातील एक प्रभावी, लोकप्रिय आणि समाजासाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. सामाजिक प्रश्न, अल्पसंख्याकांचे हक्क, शेतकरी आणि युवकांच्या समस्या यासाठी ते सातत्याने सक्रिय होते. त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दरम्यान, पोलिसांनी तपास वेगाने सुरू असल्याचे सांगत लवकरच महत्त्वाचे धागेदोरे हाती येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेने परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

Related News