अकोटमध्ये जप्त जनावरांबाबत प्रश्नचिन्ह; गोरक्षणातील व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी

गोरक्षणातील
अकोटमध्ये जप्त जनावरांबाबत प्रश्नचिन्ह; गोरक्षणातील व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी

अकोट : अकोट पोलीस विभागामार्फत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या अनेक जनावरांची सुटका करून त्यांना जीवनदान दिले जात असल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेली ही जनावरे पुढील देखभालीसाठी अकोट येथील गोरक्षण संस्थेकडे सुपूर्द केली जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू असून, हजारो गोवंश गोरक्षणमध्ये सांभाळले जात असल्याचे सांगितले जाते.

गोरक्षण संस्थेमार्फत या जनावरांना चारापाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. अनेक दानदातेही पुढाकार घेऊन या गोवंशांच्या संगोपनासाठी मदत करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कत्तलीच्या तावडीतून सुटलेल्या जनावरांना सुरक्षित जीवन मिळत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते.

Related News

मात्र, याच पार्श्वभूमीवर आता काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने जप्त करून गोरक्षणच्या ताब्यात दिलेली सर्व जनावरे आजही सुरक्षित आणि अस्तित्वात आहेत का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शहरात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की, काही वर्षांपूर्वी सुपूर्द केलेली सर्व जनावरे सध्या गोरक्षणमध्ये उपलब्ध नाहीत.

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून जप्तीतील जनावरे सुपूर्दनाम्यावर गोरक्षणकडे देण्यात येत आहेत. मात्र, त्या जनावरांची नियमित पडताळणी झाली आहे का, हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन गोरक्षणला प्रत्यक्ष भेट देऊन नोंदी, सुपूर्दनामे आणि प्रत्यक्षातील जनावरांची संख्या याची सखोल तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, पारदर्शकता आणि विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करावी, अशी अपेक्षा अकोटकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related News