पुंडा गाव बनले प्रभारी कर्मचाऱ्यांचे ‘माहेरघर’; ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका प्रभारी – पोलिस पाटील, कोतवाल पदे रिक्त

माहेरघर

पुंडा | प्रतिनिधी – दिपक दाभाडे

पुंडा गावात अनेक महत्त्वाच्या शासकीय पदांवर कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे नागरिकांची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक आणि आरोग्य सेविका हे सर्वच प्रभारी स्वरूपात काम पाहत असल्याने ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गावातील ग्रामसेवकांची बदली सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी झाली असून त्यानंतर अद्याप नियमित ग्रामसेवक नेमण्यात आलेला नाही. सध्या असलेल्या प्रभारी ग्रामसेवकांकडे तीन गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते केवळ ग्रामसभेच्या वेळीच गावात दिसतात. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. “गावाला नियमित ग्रामसेवक द्यावा,” अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related News

कोतवाल पदाचीही परिस्थिती काहीशी अशीच आहे. अनेक वर्षांनंतर हे पद भरले गेले होते; मात्र संबंधित कोतवालांच्या अकाली निधनानंतर जवळपास १४ महिन्यांपासून ही जागा रिक्त आहे. कोतवाल हा महसूल विभागातील गावपातळीवरील महत्त्वाचा कर्मचारी असून जमिनीचे रेकॉर्ड सांभाळणे, महसूल गोळा करणे आणि सरकारी टपाल पोहोचवणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. हे पद रिक्त असल्याने कामाचा अतिरिक्त ताण तलाठ्यावर आला आहे.

तलाठीही सुट्टीवर असल्यामुळे गावात प्रभारी व्यवस्थेवरच काम सुरू आहे. कृषी सहाय्यकांचे मुख्यालय पुंडा येथे असले तरी त्यांच्या अखत्यारीत तब्बल बारा गावे असल्याने त्यांनाही पूर्णवेळ लक्ष देणे शक्य होत नाही.

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचीही अवस्था वेगळी नाही. येथे आरोग्य सेविका प्रभारी असून कर्मचारी प्रामुख्याने लसीकरणाच्या दिवशीच उपस्थित दिसतात. परिणामी, आरोग्य सेवांवरही परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

सहा वर्षांपासून पोलिस पाटील पद रिक्त

गावातील पोलिस पाटील पद सुमारे सहा वर्षांपासून रिक्त आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ नुसार पोलिस पाटील हे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देणे आणि गावात शांतता राखण्याचे काम करतात. पोलीस आणि गावकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले हे पद रिक्त असल्याने स्थानिक प्रशासनावर त्याचा परिणाम होत आहे.

“शासनाने आमचे गाव वाऱ्यावर सोडल्यासारखे वाटते. सर्व कर्मचारी प्रभारी असल्याने नागरिकांना त्यांचा शोध घेत फिरावे लागते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.”
सुधाकर पाटील पुंडकर, उपसरपंच, ग्रामपंचायत पुंडा

“पोलिस पाटील आणि कोतवाल पदे रिक्त आहेत, त्यात ग्रामसेवकही प्रभारी. एवढे मोठे गाव असूनही सर्वच पदे प्रभारी असतील तर शासनाने आमचे गाव वाळीत टाकले का?”
नरेश पाटील पुंडकर, सदस्य, ग्रामपंचायत पुंडा

read also :  https://ajinkyabharat.com/5-best-gadgets-for-women-powerful-smart-devices-that-will-make-womens-life-very-easy/

Related News