अकोला :अकोला–जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील निंबा फाटा ते काझीखेळ दरम्यानचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता जणू काही रस्ता न राहता खेळवाट बनल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अकोल्यावरून जळगावकडे जाणारा प्रवास अत्यंत किचकट झाला आहे. पूर्वी दोन ते अडीच तासांत पूर्ण होणारा प्रवास आता तब्बल चार तासांपर्यंत लांबत असल्याचे नागरिक सांगतात. विशेषतः अवजड वाहने, खासगी बस, रुग्णवाहिका तसेच दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांची तीव्रता वाढली असून, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.
या मार्गावर वारंवार अपघात घडत असून, अनेक नागरिक जखमी होत आहेत. मागील आठवड्यात बहादूर फाट्याजवळ वझेगाव येथील सत्यपाल अशोक वाघ यांचा अपघात झाला होता. सुदैवाने त्यांचा जीव वाचला, मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला. नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती.
Related News
निंबा गावाचे या रस्त्यावर विशेष महत्त्व आहे. निंबामध्ये प्राथमिक उपआरोग्य केंद्र, राष्ट्रीयीकृत बँक, तसेच श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय आहे. निंबा परिसरातील किमान १८ गावे या ठिकाणाशी जोडलेली असून, या गावांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज निंबामध्ये ये-जा करतात. मात्र, खड्डेमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधण्यात आला. यावेळी विभागाकडून येत्या दोन ते तीन दिवसांत रस्त्याच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक स्वरूपात खड्डे बुजविणे, खराब झालेल्या भागावर मुरूम व डांबर टाकणे अशी कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात तरी नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
इनफॅक्ट : बातमीनंतर कारवाई
१२ नोव्हेंबर रोजी दै. अजिंक्य भारतमध्ये निंबा फाटा–काझीखेळ रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली. दुसऱ्याच दिवशी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण रस्त्याचे निरीक्षण केले. रस्त्याची स्थिती अत्यंत खराब असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लवकरच दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असले, तरी ही डागडुजी तात्पुरती न राहता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी ठाम मागणीही होत आहे. अन्यथा काही महिन्यांतच पुन्हा रस्त्याची हीच अवस्था होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/vanchit-bahujan-aghadi-took-to-the-election-field-with-full-enthusiasm/
