NCP Andolan : महागाईविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; नवी मुंबईत आंदोलन तापलं, रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ, घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये झालेली वाढ आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नवी मुंबईत जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. सुरुवातीला शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनाने काही वेळातच आक्रमक वळण घेतल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबईतील आंदोलनस्थळी भांडी वाजवून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी भररस्त्यात चूल पेटवून भाकरी थापत सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीने रोष व्यक्त केला.
आंदोलनाला उग्र वळण
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र घोषणाबाजी तीव्र होत गेल्यानंतर आंदोलन अधिक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.
Related News
पोलिसांनी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. महिला पदाधिकाऱ्यांमध्ये सक्षणा सलगर आणि रोहिणी खडसे यांनाही पोलिस व्हॅनमधून हलविण्यात आले. या कारवाईनंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महागाईविरोधात राष्ट्रवादीचा हल्लाबोल
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय” अशा घोषणांसह सरकारविरोधात जोरदार आवाज उठवला. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे नेत्यांनी सांगितले. सरकारने या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
रोहित पवार काय म्हणाले?
आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकांचे जीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे.”
“सामान्य माणसाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सरकार झोपलेले असेल तर त्यांना जाग आणण्याचे काम आम्हाला करावे लागेल. सरकार आमचे ऐकेल किंवा नाही हे पुढचे, पण लोकांच्या हक्कासाठी लढणे ही आमची जबाबदारी आहे,” असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, महागाईचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना बसत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला जाईल.
सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारवर टीका केली. त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
“राज्याची नव्हे तर संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. याबाबत आम्ही संसदेत अनेक वेळा आवाज उठवला आहे. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी आणि देशाच्या आर्थिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा व्हावी,” असे त्या म्हणाल्या.
महागाई हा केवळ राजकीय मुद्दा नसून सामान्य नागरिकांच्या जगण्याशी संबंधित विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले. “प्रामाणिकपणे कर भरणारा आणि कष्ट करून उदरनिर्वाह करणारा सामान्य नागरिक महागाईच्या चक्रात भरडला जात आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.
बेरोजगारीचाही मुद्दा चर्चेत
महागाईबरोबरच बेरोजगारीचा प्रश्नही आंदोलनाचा प्रमुख मुद्दा होता. शिक्षित तरुणांना रोजगार मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
राज्यात आणि देशात रोजगारनिर्मितीचा वेग कमी झाल्याने तरुणांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे सांगत सरकारने रोजगारवाढीसाठी ठोस धोरण आखावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
नवी मुंबईतील या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या आंदोलनातून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, या आंदोलनावर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते आणि सरकार महागाईसंदर्भात कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्यांवरून सुरू झालेले हे आंदोलन आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. जनतेच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या या संघर्षामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
