नागपूर, दि. 4 मार्च : वीज वितरण व्यवस्थेतील महत्त्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमन बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलात ‘राष्ट्रीय लाईनमन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देण्याचा संकल्प केला.
काँग्रेसनगर विभागात आयोजित प्रमुख कार्यक्रमात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना आरोग्याची काळजी घेणे आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या ‘सुरक्षा शपथ’ घेतली. यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी ध्वनीचित्रफितीद्वारे लाईनमन बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या संदेशात वीज पुरवठा व्यवस्थेत लाईनमनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
Related News
मार्गदर्शन करताना दिलीप दोडके म्हणाले की, अनेकदा अतिआत्मविश्वास किंवा किरकोळ निष्काळजीपणामुळे अपघात घडतात. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षा साधनांचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. सध्या वीज वितरण व्यवस्थेत स्मार्ट मीटर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही स्वतःला ‘स्मार्ट’ बनवणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. त्यामुळे सतत शिकण्याची तयारी ठेवून स्वतःला अधिक सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांशी संवाद साधण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांना सर्वप्रथम लाईनमनचीच आठवण येते. अशा वेळी संयमाने परिस्थिती समजावून सांगून ग्राहकांचे समाधान करणे हेही कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महावितरणमध्ये 2013 पासून महिलांना 30 टक्के आरक्षण देण्यात आल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत संस्थेची प्रतिमा उजळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जीवतोडे, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह दिलीप राऊत, कन्हैया सोमवंशी, लक्ष्मण वैरागडे, सचिन जांभुळकर, विद्या पठाडे, योगेश्वरी बाहे, अमोल धुलधर, रमेश वाटकर, निलेश भगत आणि राहुल लांजेवार आदी अधिकारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन करत सर्वांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन कृतिका जोशी यांनी केले. प्रास्ताविक जयंत ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन अभिलाष बारापात्रे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी, अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, सिव्हील लाईन्स विभागातही ‘राष्ट्रीय लाईनमन दिन’ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘अपघात शून्य’ आणि ‘थकबाकी शून्य’ हे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. या वेळी धम्मदीप फुलझेले आणि हेमराज ढोके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. लाईनमन प्रतिनिधी म्हणून अपेक्षा बहादुरे आणि पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन सिंधु वानखेडे यांनी केले, तर आभार विनय गोंधळे यांनी मानले.
