वाशीम :: नागठाणा येथील १७ वर्षीय वेद सोळंके ह्यानी आपल्या अलौकिक कर्तृत्वाच्या बळावर ‘राईज’चा जागतिक विजेता होण्याचा बहुमान मिळवला आहे. हे जगज्जेतेपद मिळवून त्याने वाशीमच्याच नव्हे तर वऱ्हाडाच्या प्रतिभेलाही गौरवान्वित केले आहे. आजन्म शिष्यवृत्तीचा मानकरी ठरलेल्या वेद ने पारंपरिक शिक्षणाच्या परिघाबाहेर जाऊन कला क्षेत्रात नावलौकिक मिळवत करोडो युवकांना शिक्षणाचा नाव पायंडा घालून दिला, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे.
गुगल चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक श्मिट, त्यांच्या सुविद्य पत्नी वेंडी श्मिट तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे भागीदार ‘ऱ्होड्स ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित ‘राईज फॉर द वर्ल्ड’ द्वारे नुकतीच ‘राईज’ स्पर्धेच्या १०० जागतिक विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यात ईयत्ता बारावीत शिकत असलेल्या वेद सोळंकेची अधिकृतरित्या निवड करण्यात आली आहे. जगातली सर्वात मोठी शिष्यवृत्ती जिंकल्यामुळे वेद चा उच्च शिक्षणासाठी परदेशी शिकण्याचा मार्गहि मोकळा झाला आहे.
सविस्तर असे कि, मानवतेसाठी कार्यरत असलेल्या जगभरातील १५ ते १७ वर्ष वयोगटातील प्रतिभावंत युवकांकडून ह्या स्पर्धेसाठी अर्ज मागविले जातात. अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ह्या जागतिक स्पर्धेसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून युवक आपले प्रयत्न पणाला लावतात. प्राप्त नामांकनातून अतिशय कठीण निवड प्रक्रियेद्वारे चातुर्य, चिकाटी, इतरांबद्दल सहानुभूती, प्रामाणिकपणा आणि इतरांसाठीची धडपड या मूल्यांच्या आधारे ५०० अंतिम स्पर्धक निवडले जातात. शेवटी ह्या ५०० युवकांमधून विविध कौशल्य चाचणी आणि मुलाखती द्वारे १०० जागतिक विजेते निवडले जातात. निवडलेल्या जागतिक विजेत्यांना सक्षम करण्यासाठी ‘राईज’ दरवर्षी ८०० करोड रुपयापेक्षा जास्त रक्कम या युवकांवर खर्च करते. या द्वारे गरज-आधारित शिष्यवृत्ती, मार्गदर्शन, नेटवर्किंग, करिअर विकासाच्या संधींमध्ये प्रवेश आणि ‘राइज ग्लोबल विनर’ म्हणून अतिरिक्त निधीची तरतूद केली जाते.
हि स्पर्धा जिंकण्यापूर्वी वेद ने ‘संयुक्त राष्ट्रात’ दिलेले भाषण, ‘गेट्स फाउंडेशन’ व ‘हंड्रेड’ चे युथ अम्बॅसेडर पद, ‘वर्ल्ड फूड फोरम’ मधील योगदान, दुबई येथील ‘कोप-२८’ मधील योगदान, ‘मर्सिडीझ बेन्झ फेलोशिप’, ‘पॉप’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे सर्व त्याला ‘राईज’ प्रत नेण्यास सहाय्यक ठरले. वेद ने नुकतीच ऑक्सफर्ड विद्यापीठाची लेखी चाचणी दिली असून त्याला जगातील नामवंत विद्यापीठात मानसशास्त्र, राज्यशास्त्र शिकून समाजाच्या शाश्वत विकासासाठी हातभार लावायचा आहे. राईज जिंकण्यासाठी वेद च्या प्रकल्पाला वाशीम सामान्य रुग्णालय, वाशीम कृषी विभाग, नागठाणा गावातील नागरिक, त्याचे शिक्षक आणि कुटूंबियांनी मोलाची मदत केली, तो सर्वांना यशाचे वाटेकरी समजतो.