मूर्तिजापूरात होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा; स्वच्छता अभियानातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन

होमगार्ड

मूर्तिजापूर : होमगार्ड जिल्हा समादेशक यांच्या आदेशानुसार मूर्तिजापूर येथील तालुका समादेशक कार्यालयात होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका समादेशक अॅड. दिलीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात होमगार्ड जवानांनी शिस्त, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे दर्शन घडवले.

वर्धापन दिनाच्या निमित्ताने तहसील मैदान परिसरात होमगार्ड सैनिकांनी स्वच्छता अभियान राबविले. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. या अभियानात जवानांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत परिसर स्वच्छ करून सकारात्मक उदाहरण घालून दिले.

यानंतर आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अंबामाता विद्यालय, गोरेगाव येथील मुख्याध्यापक प्रदीप कांबे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम, उषा वानखडे तसेच तालुका समादेशक अॅड. दिलीप नाईक यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

Related News

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक प्रदीप कांबे यांनी होमगार्ड जवानांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपत्ती व्यवस्थापन, कायदा-सुव्यवस्था राखणे, निवडणूक प्रक्रिया तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये होमगार्डचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या सुरक्षेसाठी होमगार्ड जवान सदैव तत्पर असतात, असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे विष्णू लोडम यांनी मार्गदर्शन करताना, “होमगार्डमध्ये सर्व धर्माचे लोक असले तरी होमगार्डचा एकच धर्म आहे—तो म्हणजे खाकी,” असे गौरवोद्गार काढले. शिस्त, एकनिष्ठता आणि राष्ट्रसेवा हीच होमगार्डची ओळख असून समाजाने या सेवेला योग्य मान दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. उषा वानखडे यांनीही होमगार्डच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

तालुका समादेशक अॅड. दिलीप नाईक यांनी आपल्या भाषणात जवानांचे मनोबल वाढवत प्रशिक्षण, शिस्त आणि सेवाभाव यावर भर दिला. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे समाजाशी नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष महल्ले, कार्यालयीन लिपिक महादेव नेमाडे, शिपाई कृष्णा रुमाले तसेच इतर होमगार्ड सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला होमगार्ड जवानांची लक्षणीय उपस्थिती होती. वर्धापन दिनाच्या माध्यमातून सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम नागरिकांच्या मनात सकारात्मक ठसा उमटवणारा ठरला.

read also : https://ajinkyabharat.com/under-atma-akot-kisan-gosthi-program-concluded-with-great-enthusiasm-at-lohari-khu/

Related News