जेजुरीत वारीदरम्यान भीषण अपघात; भरधाव टेम्पो दिंडीत घुसला, 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
आषाढी वारीदरम्यान पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव टेम्पो घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक वारकरी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडहून जेजुरीच्या दिशेने जात असताना सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. जेजुरी परिसरात वारीदरम्यान भंडाऱ्याची उधळण सुरू असताना अचानक एक टेम्पो अनियंत्रित झाला आणि थेट दिंडीत घुसला. टेम्पोच्या जोरदार धडकेत अनेक वारकरी जखमी झाले.
या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत महिला सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Related News
अपघात नेमका कसा घडला?
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीमध्ये दाखल झाल्यानंतर वारकरी भंडाऱ्याची उधळण करत होते. याचवेळी वारीतील एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा टेम्पो दिंडीत शिरला. अचानक झालेल्या या घटनेमुळे घटनास्थळी मोठी धावपळ उडाली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टेम्पोच्या धडकेत सुमारे 15 ते 16 वारकरी जखमी झाले आहेत. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
सासवड-जेजुरी मार्गावर झालेल्या या अपघातानंतर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कसे सुटले, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताची कारणे शोधण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.
सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला शोक
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी मृत वारकरी महिलांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
जखमी वारकऱ्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले.
रोहित पवार यांची चौकशीची मागणी
आमदार रोहित पवार यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. दिंडीतील वाहनाच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू होणे अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी म्हटले.
या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ramdas-athavales-massive-cow-slaughter-sharad-pawar-becomes-president/
