जांभोरा गावातील महिलांचा संताप : अवैध जुगार–दारू व्यवसायावर बंदीची मागणी; पोलिस अधीक्षकांकडे निवेदन सादर

जांभोरा

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा गावात अवैध जुगार, दारू आणि मटका यांसारखे धंदे खुलेआम सुरू असून, त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी केली आहे. या सर्व अवैध धंद्यांवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी महिला मंडळ व ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

महिलांच्या म्हणण्यानुसार, जांभोरा हे किनगाव राजा पासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेले गाव असून, येथे देशी दारूची तीन दुकाने सुरू आहेत. किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या गावात काही व्यक्तींनी जुगार, दारू विक्री आणि मटका यांचे अड्डे राजरोसपणे सुरू केले आहेत. या अवैध व्यवसायांमुळे गावातील तरुण वर्ग नशेच्या आहारी जात असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूमुळे आत्महत्येच्या घटनाही घडत असून, गावातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे.

महिलांनी निवेदनात नमूद केले आहे की, या सर्व अवैध प्रकारांमुळे जांभोरा गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे गंभीर प्रकरण आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गावातील अवैध व्यवसायांवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related News

या निवेदनावर “अमले विश्वासू” यांची स्वाक्षरी असून, तो बुलढाणा येथे सादर करण्यात आला आहे. निवेदनावर तिशी ते चाळीस महिलांच्या स्वाक्षऱ्या असून, याची प्रत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस, पोलिस निरीक्षक किनगाव राजा, पोलिस उपनिरीक्षक देऊळगाव राजा आणि तहसीलदार देऊळगाव राजा यांनाही पाठविण्यात आली आहे.

ग्रामस्थ आणि महिलांनी मागणी केली आहे की, जांभोरा गावात आणि शिवारात सुरू असलेले सर्व अवैध जुगार, दारू आणि मटका व्यवसाय त्वरित बंद करून गावात शांतता, कायदा आणि सुव्यवस्था टिकवली जावी. महिलांनी प्रशासनाने ठोस पावले उचलून तरुण पिढीचे भविष्य वाचवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/election-announcement/

Related News