अकोल्यातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ; जमाअत-ए-इस्लामी हिंदचा प्रशासनाला इशारा

जमाअत-ए-इस्लामी हिंद

अकोला –शहराच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही अकोला आजही स्वच्छतेपासून रस्त्यांपर्यंत आणि वाहतूक व्यवस्थेपासून नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत गंभीर समस्यांनी ग्रस्त आहे. झपाट्याने आधुनिक होत असलेल्या जगात अकोल्याचे मागे पडणे ही चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया जमाअत-ए-इस्लामी हिंद, अकोला शाखेने व्यक्त केली आहे.

मानवकल्याणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने पत्रकार परिषद घेत शहरातील बिघडलेली परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम असल्याचा आरोप केला. “विकास योजनांमध्ये सुधारणा करून सर्व नागरिकांना भेदभावमुक्त समान सुविधा उपलब्ध कराव्यात,” अशी मागणी त्यांनी स्पष्टपणे मांडली.

स्वच्छतेची बिकट अवस्था

महानगरपालिकेच्या माहितीनुसार शहरात सुमारे 700 स्थायी आणि 600 कंत्राटी कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त आहेत. परंतु वास्तविकता याच्या पूर्ण विरुद्ध दिसते.
अनेक भागांत कचरा दिवसेंदिवस साचलेला असून पश्चिम विभाग, झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्या सर्वाधिक प्रभावित आहेत. काही अपवादात्मक भाग वगळता अनेक वॉर्डमध्ये नियमित सफाई न होणे हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप संस्थेने केला.

Related News

कचरा उचलण्याचे काम खाजगी कंपनीकडे दिले असले तरी गरीब वस्त्यांतील नागरिकांकडून प्रतिमहिना आकारले जाणारे ५० रुपये शुल्क अनुचित असल्याचेही ते म्हणाले.
अनियमित सफाईमुळे शहरात वाढत्या ‘कचरा पॉइंट्स’कडे लक्ष वेधून या ठिकाणी रोगराई पसरण्याचा धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पॉइंट्सवर सीसीटीव्ही बसवणे, दंडात्मक कारवाई करणे आणि मोकळ्या जागांचा उपयुक्ततेने वापर करण्याची मागणी करण्यात आली.

रस्त्यांची दयनीय अवस्था — भ्रष्टाचाराची देणगी ?

गंगानगर, भारत नगर, नायगाव आणि भागवतवाडी यांसारख्या भागांत खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत.गंगानगरात पावसाळ्यात तर वाहतूक करणे अशक्य होते. तर दामले चौक ते अकोट स्टँड या मुख्य मार्गावर केलेली रस्ता दुरुस्ती काही दिवसातच खड्ड्यांनी भरली.“रस्ता खड्ड्यात आहे की खड्डे रस्त्यात?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.रस्ते आणि नाल्यांची तातडीने दुरुस्ती, बांधकामावरील गुणवत्ता तपासणी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संस्थेने केली.

वाहतूक कोंडी — नागरिकांचा जीव मुठीत

अकोल्यातील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस गंभीर समस्या बनत आहे.अकोट फेल रेल्वे ब्रिज आणि गांधी चौक परिसरात सायंकाळच्या वेळी मोठी गर्दी होत असून अतिक्रमण, वाहतूक पोलिसांची कमतरता आणि योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.गुरुद्वाऱ्याजवळील वाहतूक कोंडीवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही संस्थेने सांगितले. वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती, आधुनिक ट्रॅफिक सिग्नल्स आणि अतिक्रमणविरोधी कारवाई ही तातडीची गरज आहे.

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

जमाअत-ए-इस्लामी हिंद मागील अनेक वर्षांपासून स्वच्छता, सामाजिक विषय आणि वाहतूक शिस्त यावर जनजागृती करत आहे. परंतु, “एका संस्थेच्या प्रयत्नांनी शहर बदलत नाही. प्रशासनाने ठोस पावले उचलणे आणि नागरिकांनी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.अकोला शहराला विकासाच्या स्पर्धेत पुढे न्यायचे असेल, तर मूलभूत सुविधांची उभारणी, पारदर्शकता आणि प्रशासनाचा सक्रिय सहभाग या गोष्टी अनिवार्य आहेत. सर्व नागरिकांना समान सुविधा उपलब्ध करून देण्याची जमाअत-ए-इस्लामी हिंदची मागणी शहराच्या विकासासाठी केवळ योग्यच नाही, तर अत्यावश्यक आहे.

read also : https://ajinkyabharat.com/goa-club-fire/

Related News