रोहित शर्माचे कर्णधारपद काढून हार्दिकला दिल्यामुळे मुंबईच्या चाहत्यांचा हार्दिक पंड्यावर रोष अधिकच वाढला आहे.
यंदाच्या आयपीएल पर्वातही हार्दिक हवी तशी कामगिरी करण्यास असमर्थ ठरला.
त्यामुळे भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने त्याच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
Related News
आता हार्दिकची टी-२० विश्वचषक स्पर्धेत निवड करत त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
हार्दिकला उपकर्णधारपद दिल्यामुळे पठाणने बीसीसीआयच्या निवड समितीवर टीका केली आहे.
पठाणने म्हटले की,’ आपण यापूर्वी पाहिले असेल की हार्दिक पंड्याला टी-२० सामन्याचे कर्णधारपद दिले होते, पण रोहित शर्मानेच याची जबाबदारी सांभाळली होती.
टी-२० विश्वचषकानंतर पंड्या आणि सूर्याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्याची नवी योजना होती.
परंतु पंड्याची खेळाबद्दल असलेली बांधिलकी व कामगिरीतील सातत्यता पाहता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.
भारतीय संघात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी नियमित घरगुती सामने खेळले पाहिजेत.
दुखापती होत असतात, पण खेळाडू घरगुती सामने खेळून सातत्यता राखू शकतो.
मग हा एक जो खेळाडू दुखापतीतून परतला आहे तो या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करतोय का?’
श्रेयस अय्यर व ईशान किशन यांना बीसीसीआयने आपल्या वार्षिक करारातून वगळले होते कारण ते रणजी ट्रॉफीत सहभागी झाले नव्हते.
पठाणने यावरुन म्हटले की, ‘ हार्दिकला पण हे समान मुद्दे लागू होत नाहीत का? अष्टपैलु हार्दिकला बीसीसीआयच्या वार्षिक करारात गट-अ श्रेणीत समाविष्ट केले आहे.
हार्दिक घोट्याच्या दुखापतीनंतर आपल्याला आयपीएलमध्ये खेळताना दिसला त्याने डी वाय पाटील स्टेडियममधील सामने खेळने अपेक्षित होते.’
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून दिले आहे. सध्या हार्दिक मुंबईचे कर्णधारपद सांभाळत असून मुंबई गुणतालिकेत ६ गुणासह नवव्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात हार्दिक गोलंदाजी व फलंदाजीत अपयशी ठरला असला तरी टी-२० विश्वचषकसाठी भारतीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे.
हार्दिकला उपकर्णधारपद दिले आहे त्याऐवजी वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहचा विचार निवड समितीने करणे अपेक्षित होते, असे पठाणने म्हटले.
इरफान पठाणने पुढे म्हटले की, विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला योग्य व समान वागणुक मिळाली पाहिजे.
जर हार्दिक पंड्याच्या उपकर्णधारपदावर बोलायचे झाले तर नेतृत्वात सातत्यता राखणे महत्त्वाचे आहे.
निवड समितीने सध्या खेळातील सातत्यता व कामगिरी यांना महत्त्व दिले पाहिजे.
त्यामुळे बुमराह एक चांगला पर्याय असू शकतो असे मला वाटते.’
पठाणने पुढे असेही म्हटले की, ‘ एका खेळाडूला खास वागणुक दिल्याने याचा परिणाम संघातील वातावरणावर होतो. संघात चुकीचा संदेश जातो.
क्रिकेट हे टेनिससारखे नाही, इथे संघात समानत राखली पाहिजे.
कोणी नवीन खेळाडू असेल किंवा रोहित शर्मा व विराट कोहली सारखे अनुभवी खेळाडू असेल तरी प्रत्येक खेळाडूला समान व योग्य वागणुक दिली पाहिजे.
मी गेल्या टी-२० वर्ल्डकपपासून बघत आहे की, खेळाच्या नियमांना जुगारुन काही खेळाडूंना अधिक फायदा दिला जात आहे, जे की स्विकारले जाणार नाही.’
हार्दिकला २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतही उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती परंतु घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला मधूनच स्पर्धेच्या बाहेर पडावे लागले होते.