रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापचे आमदार जयंतभाई पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केली होती या टीकेला आता सुनील तटकरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हाला शिकवू नका, असे खडेबोल सुनावले. तसेच, तुम्ही आत्मपरीक्षण करा तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टीका का करता, असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला. महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रायगड जिल्हयात रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी तटकरे बोलत होते.
अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं. जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते. परंतु त्या सभेला जिल्ह्यातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली अशा शब्दात तटकरे यांनी जयंत पाटील यांचा समाचार घेतला.
माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला, येणार्या संकटांना सामोरे जातो; याच कष्टकरी समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली.
Related News
माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील, असं आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
या मतदारसंघात ४ जूनला घड्याळ्याचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल, असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.