Dhananjay Munde : “सगळ्यांना एकच व्यक्ती दिसतो… आता मी जगावं की मरावं?” धनंजय मुंडेंच्या भावनिक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्या नाराजीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चा
बीडच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी नाराजीचा सूर व्यक्त केला होता. काही वक्तव्यांमध्ये राजकारणातून निवृत्तीपर्यंतची भाषा वापरण्यात आली होती. त्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत या प्रकरणाची चर्चा रंगली.
याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली व्यथा मांडली. माध्यमांकडून होत असलेल्या टीकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. “सगळ्यांना एकच व्यक्ती दिसतो. माझ्यावर कितीही टीका करा, पण माझ्या मुला-बाळांवर, माझ्या मातीवर आणि बीडच्या जनतेवर आरोप करू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवरून काँग्रेसवर निशाणा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवर धनंजय मुंडे यांनी जोरदार पलटवार केला. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून करण्यात आलेल्या टीकेचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसवर द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप केला.
Related News
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक; भरसभेत डोळ्यांत अश्रू
UPI शुल्कावरून राज ठाकरे संतापले; मोदी सरकारला थेट सवाल, म्हणाले- ‘डिजिटल सापळा’
रेजीनगर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट! Mamata Banerjee च्या उमेदवाराचा ‘यू-टर्न’, माघारीचा निर्णय बदलला
VIDEO : ट्रेनमध्ये टीसीने तिकीट मागितलं, महिलेने थेट कपडे फाडले; नेमकं काय घडलं?
मीटरवर दिसणारी ‘ही’ खूण नेमकी काय सांगते? वीज बिल कमी की जास्त, जाणून घ्या सत्य
दुष्काळात काजू-बादामावर ताव; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीस म्हणाले, “अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत”
8 महिन्यांची चिमुकली मध्यरात्री अंथरुणातून गायब; नाशिकमध्ये खळबळ
ट्रम्प यांची मोठी चाल! रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफची टांगती तलवार
पेट्रोल पंपांवर UPI पेमेंटला ब्रेक? 2 हजारांवरील व्यवहाराबाबत मोठी चर्चा
FDAच्या गुणवत्ता चाचणीत पॅरासिटामोल फेल; तब्बल 1.25 लाख गोळ्या माघारी
एपस्टीन फाइल्सवरून राऊतांचा खळबळजनक दावा; ‘अमेरिकेला प्रोटेक्शन मनी दिली जात आहे’
“सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून काँग्रेसच्या मनात किती द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यांमधून दिसून येते. काँग्रेसने स्वतःचा इतिहास पाहिला असता तर बरे झाले असते. इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या तेव्हा विरोधकांनी अशाच प्रकारची टीका केली होती,” असे धनंजय मुंडे म्हणाले.
तसेच त्यांनी काँग्रेसला पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही घेरले. “झारखंडमध्ये पेपरफुटी झाली आहे, दिल्लीत आंदोलन झाले आहे. मात्र त्यावर काँग्रेसने किती गांभीर्याने भूमिका घेतली, हे जनतेला दिसत आहे,” अशी टीका त्यांनी केली.
“सुनेत्रा पवार यांनी कणखर काम करून दाखवले”
सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यावर बोलताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री म्हणून त्यांनी दौरा केला असून, त्या दिवशी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्यांनी काम केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी निवेदनाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली.
“त्या पहिल्यांदाच बीडमध्ये आल्या होत्या. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सामान्य नागरिकांप्रती असलेल्या निष्ठेसाठी त्या आल्या होत्या. दादांच्या कामांचा विषय निघाला तेव्हा त्या भावनिक झाल्या. त्यामुळे मी त्यांना थांबायला सांगितले,” असे मुंडे म्हणाले.
बीडमधील माध्यमांबाबत बोलताना त्यांनी ९५ टक्के पत्रकार चांगले काम करत असल्याचे सांगितले. मात्र काही लोकांना बीडमधील राजकारण शांत होऊ द्यायचे नाही, असा आरोप त्यांनी केला.
“चमत्कार” वक्तव्यावर धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण
काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी केलेल्या “चमत्कार” या वक्तव्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. हे वक्तव्य राजकारणाशी संबंधित नसून आरोग्याच्या संदर्भात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“चमत्कार माझ्या तब्येतीसाठी होता, राजकारणासाठी नव्हता. मी शांतपणे बोला असे सांगितले होते. पत्रकार परिषद नव्हती, तर निवेदन होते. त्यात हुकूमशाही कुठून आली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच आपल्यावर झालेल्या टीकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “३५ वर्ष मी राजकारण आणि समाजकारणात काम केले. २५२ दिवस माझे मीडिया ट्रायल झाले. माझ्या भाषणाचा सार काढा, तर्क काढा आणि त्यावर टीका करा,” असे आवाहन त्यांनी केले.
“आता मी जगावं की मरावं?” भावनिक उद्गार
माध्यमांमध्ये आणि राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या टीकेमुळे आपण व्यथित झाल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
“सगळ्यांना एकच व्यक्ती दिसतो. माझ्यावर काहीही टीका करा, ती मला मान्य आहे. पण माझ्या मुला-बाळांवर, माझ्या मातीवर आणि बीडला बदनाम करण्याचे काम करू नका. भाषणात मी चमत्कार दाखवण्याची वेळ आली आहे असे म्हटले होते, ते आरोग्याच्या संदर्भात होते. आता काय करणार? आता मी जगावं की मरावं?” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
आपण संवेदनशील व्यक्ती असून समाजकारणात काम करत असल्याचे सांगताना त्यांनी माध्यमांकडून होत असलेल्या टीकेवर प्रश्न उपस्थित केला.
“माझे मीडिया ट्रायल केले जात आहे. मला टार्गेट केले जात आहे. एका समाजघटकाला बदनाम करण्याचे काम केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
न्यायालयीन निर्णयाचा दाखला देत विरोधकांवर टीका
धनंजय मुंडे यांनी न्यायालयीन प्रकरणांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. “नियतीवर माझा विश्वास आहे. मी आरोप करताना पुरावे देत होतो. न्यायालयाने काही प्रकरणांमध्ये समोरच्यांवर दंड ठोठावला आहे,” असे ते म्हणाले.
तसेच बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. मात्र प्रत्येक वेळी बीडचा विषय आला की कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जातो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बीडला बदनाम करू नका, धनंजय मुंडेंचे आवाहन
शेवटी धनंजय मुंडे यांनी बीड आणि परळीतील नागरिक तसेच माध्यमांना आवाहन केले. “माझी हात जोडून विनंती आहे, बीड आणि परळीला बदनाम करू नका. माझ्या मातीचा अपमान होऊ देऊ नका,” असे ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या या भावनिक वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. मुंडे बहीण-भावाच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
