अकोट :
तालुक्यातील लोहारी खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व आदर्श मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शालेय वातावरणात विशेष उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश वानखडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या थोर विभूतींना अभिवादन केले.
यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी राजनंदनी सपकाळ, प्राची वानखडे, नैना डोंगरे व अंजली इंगळे यांनी भावपूर्ण जिजाऊ वंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता व मनोगते सादर करत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
Related News
दुर्गुणांच्या होळीचा संकल्प; जय बजरंग विद्यालय चान्नी येथे स्काऊट-गाईडचा अनोखा उपक्रम
‘इको-फ्रेंडली’ होळी आणि ‘सशस्त्र सेना ध्वज दिन’ निधी संकलन उपक्रम उत्साहात संपन्न
चिमुकल्यांच्या बोबड्या भाषेतून घुमला शिवरायांचा जयघोष – डोणगाव
मूर्तिजापूरमध्ये अग्निशमन दलाच्या गाडीचे चाक चोरीला; तक्रार नाही, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
संध्या डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
लोहारी खुर्द येथे त्रिदिवसीय प्रजासत्ताक सोहळा उत्साहात संपन्न
अकोट तालुक्यात यंत्राद्वारे कापूस वेचणीचा पहिला प्रयोग यशस्वी
यामध्ये सर्व्हेश म्हैसने, भाविक वाकडे, प्रेम गवई, संघर्ष सपकाळ, नैना डोंगरे, आरुषी वानखडे आदी विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आदर्श मातृत्वाचे, तर स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचे सखोल विवेचन केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून आत्मविश्वास, अभ्यासपूर्ण मांडणी व देशप्रेमाचा सूर स्पष्टपणे जाणवत होता.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक नितीन धोरण यांनी “जगातील स्फूर्तिदायी व आदर्श मातृत्वाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ होय. शिवरायांच्या जडणघडणीत त्यांचे संस्कार, शिस्त व राष्ट्रभक्तीचे बीज अत्यंत महत्त्वाचे ठरले,” असे प्रतिपादन केले.
तर शिक्षिका रुपाली ढवळे यांनी आपल्या भाषणात “स्वामी विवेकानंदांनी भारताची आध्यात्मिक, सांस्कृतिक व बौद्धिक ओळख संपूर्ण जगासमोर अभिमानाने मांडली. युवकांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेश वानखडे, तसेच सोनाली निचळ व सोनाली उज्जैनकर यांनीही मनोगत व्यक्त करत शिवरायांच्या व्यक्तिमत्त्व घडणीत राजमाता जिजाऊ यांचे योगदान, त्यांचे संस्कार व स्वराज्याची प्रेरणा यांचा सविस्तर आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी म्हैसने व सलोनी वानखडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभारप्रदर्शन अंजली इंगळे हिने केले.
कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थिनींनी साकारलेले राजमाता जिजाऊंचे वेश. कु. गुंजन म्हैसने, कृष्णाली डोबाळे, दिव्या वानखडे, क्रांती वानखडे, आराध्या डोबाळे, श्रद्धा वानखडे, प्राची डोंगरे व अनुष्का सपकाळ यांनी जिजाऊंच्या वेशभूषेतून कार्यक्रमात रंगत आणली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नितीन धोरण, शिक्षक सोनाली निचळ, रुपाली ढवळे, सोनाली उज्जैनकर तसेच शापोआ कर्मचारी भुजिंगराव इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कार व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
