भारतीय जनता पार्टी अकोट ग्रामीण मंडळाच्या वतीने मुंडगाव येथे काँग्रेसच्या पत्राची जाहीर होळी करत महाविकास आघाडीचा तीव्र निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात या महिन्याची रक्कम जमा करू नये, असे निवेदन महाविकास आघाडीने दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या पार्श्वभूमीवर महिलांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या भूमिकेविरोधात भाजपाने आक्रमक आंदोलन छेडले.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यावर महिलाविरोधी मानसिकतेचा आरोप केला. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलनादरम्यान भाजपा नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की महिलांच्या खात्यात थेट मदत पोहोचू नये, अशी भूमिका पूर्णतः महिलाविरोधी असून ती कदापि सहन केली जाणार नाही. महिलांच्या हक्कांवर कुणीही गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाचा संघर्ष अधिक तीव्र होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता रोखण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल, असेही भाजपातर्फे जाहीर करण्यात आले.
Related News
या आंदोलनात अकोट ग्रामीण मंडळातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. महिलांच्या हिताशी तडजोड करणाऱ्या राजकारणाचा पर्दाफाश करण्यासाठी ही लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
भाजपाने स्पष्ट केले की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू असलेल्या योजनांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नसून महिलांच्या सन्मानाची व सुरक्षिततेची हमी आहे. त्यामुळे या योजनेविरोधातील कोणताही कट भाजपाने उघडकीस आणून जनतेसमोर मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
read also : https://ajinkyabharat.com/shivaji-mahavidyalaya-students-get-laurels-in-powerlifting-competition
