पशुपालक आक्रमक : लंम्पी व लाळ्या-खुरकुताचा कहर, वासराचा मृत्यू; अधिकारी सुटीवर – कारवाईची जोरदार मागणी

लंम्पी

अकोट :अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या जनावरांवर लंम्पी, लाळ्या-खुरकुत (एफएमडी) व ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांनी थैमान घातले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत पणज येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार पूर्णपणे रामभरोसे असल्याचा आरोप पशुपालकांकडून होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वडाळी देशमुख व अकोलखेड परिसरात रोगराई वाढत असून उपचाराअभावी एका वासराचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वडाळी देशमुख येथील शेतमजूर सचिन वैतकार व कैलास खडीशंकर यांच्या गोठ्यातील सुमारे १० ते १२ जनावरांना लाळ्या-खुरकुताची लागण झाली आहे. जनावरांची अवस्था गंभीर असतानाही वेळेवर उपचार मिळाले नसल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे. याबाबत पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी ‘कॅम्प घेऊन उपचार केल्याचा’ दावा केला. मात्र या उपचारांबाबत कोणतीही पूर्वसूचना, दवंडी किंवा ग्रामपंचायतीला माहिती देण्यात आली नसल्याचे सरपंचांनी स्पष्ट केल्याने कर्मचाऱ्यांचा दावा संशयास्पद ठरत आहे.

या प्रकरणी पशुविकास अधिकारी श्रीकांत गावंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नंतर ते सुटीवर असल्याचे सांगण्यात आल्याने पशुपालकांचा संताप अधिकच वाढला आहे. “रोगराई वाढत असताना अधिकारी सुटीवर कसे जाऊ शकतात?” असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Related News

अकोलखेड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज अभियान पंधरवड्या’ दरम्यानही एकही जबाबदार अधिकारी परिसरात उपस्थित नव्हता, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याच काळात लंम्पीच्या साथीमुळे दादाराव रायबोले यांचा सुमारे ८० हजार रुपये किमतीचा गोरा (वासराचा खोंड) दगावला. याशिवाय गोपाल रंधे यांच्या बैलाची प्रकृतीही खालावली असून उपचाराअभावी त्याचेही भवितव्य धोक्यात आले आहे.

परिसरात रोगांचा प्रसार वेगाने होत असतानाही लसीकरण मोहीम, औषधोपचार किंवा तातडीची आरोग्य शिबिरे न झाल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दवाखाना असूनही वेळेवर सेवा मिळत नसल्याने हा दवाखाना केवळ ‘शोभेची वस्तू’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

या गलथान कारभाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, मृत व आजारी जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई द्यावी तसेच संपूर्ण परिसरात आरोग्य शिबिर आयोजित करून लसीकरण व औषधोपचार करावेत, अशी जोरदार मागणी त्रस्त पशुपालकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/congress-government-in-daryapur-municipal-council-18-corporators-victorious/

Related News