भाजपला मोठा धक्का! युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘एकला चलो’ भूमिका ; अपक्ष उमेदवारीमुळे स्टेशन विभागात पक्षाचे गणित कोलमडणार?

भाजपला मोठा धक्का!

भाजपला मोठा धक्का! युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘एकला चलो’ भूमिका ; अपक्ष उमेदवारीमुळे स्टेशन विभागात पक्षाचे गणित कोलमडणार?

मूर्तिजापूर : नगरपालिका निवडणुका जवळ आल्या असताना भाजपला मोठी गळती लागली आहे. गेली २२ वर्षे भाजपमध्ये कार्यरत राहून युवा मोर्चाची मजबूत बांधणी करणारे आणि संघटनात महत्त्वाची भूमिका बजावणारे राहुल पाटील यांनी पक्षाची साथ सोडली असून प्रभाग १२ ‘अ’ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्टेशन विभागात भाजपच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

राहुल पाटील हे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष असून युवकांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. संघटन उभारणी, पक्षविस्तार आणि युवकांना जोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये त्यांची स्वतंत्र छाप निर्माण झाली होती.

Related News

पाटील परिवाराचा भाजपशी असलेला जवळचा संबंधही लक्षणीय आहे. मागील कार्यकाळात त्यांच्या पत्नी सौ. सरिता राहुल पाटील या भाजपच्या नगरसेविका म्हणून काम पाहत होत्या, तसेच त्या पक्षाच्या महिला शहर उपाध्यक्ष पदावरही कार्यरत होत्या. त्यामुळे पक्षात या कुटुंबाचा प्रभाव ठसठशीत पद्धतीने दिसत होता.

मात्र, अचानक झालेल्या या गळतीमुळे भाजपमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या अंतर्गत नाराजीचाही सूर काही कार्यकर्त्यांतून येत असून, प्रभाग १२ ‘अ’ सोबतच संपूर्ण स्टेशन विभागात भाजपच्या जिंकण्याच्या शक्यता कमी होऊ शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणाऱ्या राहुल पाटील यांच्या मैदानात येण्याने स्थानिक निवडणुकीच्या समीकरणात मोठा बदल होणार हे स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत या राजकीय घडामोडींना कोणते नवे वळण मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/increase-in-the-number-of-opposition-candidates-in-murtijapur-municipal-council-elections-main-reason-is-tension-and-resentment-within-the-parties/

Related News