नागपूर : महिलांनी कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याची जपणूक करणे तितकेच महत्त्वाचे आहे. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ रक्तविकारतज्ज्ञ डॉ. प्रिया बल्लीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या नागपूर परिमंडलातर्फे यंदाचा आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्यंत उत्साहात आणि महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या विविध उपक्रमांसह साजरा करण्यात आला. काटोल रोड येथील विद्युत भवन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी तसेच महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके उपस्थित होते. यावेळी अधीक्षक अभियंता संजय वाकडे, महेश वैद्य, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, कार्यकारी अभियंता महेश चतुर्वेदी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, प्रणाली विशेषज्ञ प्रविण काटोले आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
Related News
कार्यक्रमाची सुरुवात महिला कर्मचाऱ्यांच्या स्वागताने झाली. यावेळी उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांचे गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाने कार्यालयीन वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. प्रिया बल्लीकर यांनी सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कामाचा ताण, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. विशेषतः कर्करोग, रक्तातील कमतरता, थकवा आणि हार्मोनल समस्यांचे प्रमाण वाढत आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महिलांनी कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रोजच्या आहारामध्ये लोहयुक्त, खनिजयुक्त आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. तसेच जंक फूडचे अतिसेवन टाळणे, नियमित व्यायाम करणे आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
विदर्भातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष मुद्दा मांडला. या भागात सिकल सेल अॅनिमिया आणि थॅलेसेमिया यांसारख्या रक्तविकारांचे प्रमाण काही प्रमाणात आढळते. त्यामुळे महिलांनी या आजारांच्या निदानासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक स्क्रीनिंग मोहिमांमध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. लवकर निदान झाल्यास योग्य उपचार घेऊन आरोग्य चांगले राखता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात बोलताना मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणच्या महिला सक्षमीकरण धोरणाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, वीज वितरण क्षेत्रात महिलांना 33 टक्के आरक्षण देणारी महावितरण ही देशातील पहिली कंपनी आहे. या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर महिला अभियंते आणि कर्मचारी वीज वितरण व्यवस्थेत सहभागी होत आहेत.
महिलांच्या सहभागामुळे संस्थेच्या कामकाजात सकारात्मक बदल झाले असून त्यांची कार्यक्षमता आणि संवेदनशीलता संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरत आहे, असेही त्यांनी नमूद केले. महावितरण ही संस्था महिलांच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षित कार्यपरिसरासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांच्यासह रिता ठाकरे, अनिता जपे, नेहा निचत आणि मनिषा बागुल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना संस्थेच्या विविध विभागांमध्ये महिलांनी बजावलेल्या जबाबदाऱ्यांचा गौरव केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अमित पेढेकर यांनी केले. त्यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
महिला दिनाच्या निमित्ताने नागपूर परिमंडलातर्फे विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. वॉकहार्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यात हाड तपासणी, रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी तसेच अशक्तपणाची चाचणी यांचा समावेश होता. या शिबिराचा लाभ 50 पेक्षा अधिक महिला कर्मचाऱ्यांनी घेतला.
याशिवाय महावितरणच्या काटोल विभागातही महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथे ज्येष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. सीमा चलखोर यांनी महिलांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य आहार आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता दिपक आघाव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा जीवतोडे, उपकार्यकारी अभियंता धीरज मेश्राम आणि पवन नंदरघने यांच्यासह स्थानिक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यालयीन जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
फोटो ओळ : महावितरणमध्ये आयोजित महिला दिन कार्यक्रमात डॉ. प्रिया बल्लीकर, मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि इतर मान्यवर उपस्थित.
