Ahilyanagarहादरलं! ‘गुन्हा दाखल करा, अन्यथा जीव देऊ’; आई-मुलाचा आत्मदहनाचा प्रयत्न, गोंधळात एकाचा मृत्यू
राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. गंभीर आरोपांवरून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत एका पीडित महिलेनं आपल्या मुलासह थेट पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळात एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
घटनेनंतर पाथर्डी शहरात मोठी चर्चा रंगली असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पीडित महिलेनं केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणात लैंगिक अत्याचार, चोरी, मारहाण, धमक्या आणि जातीवाचक शिवीगाळ यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे.
Related News
Ahilyanagar पोलीस ठाण्यासमोर अचानक गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगपूर येथील पीडित महिला आणि तिचा मुलगा सोमवारी सायंकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी काही व्यक्तींविरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत दोघेही आक्रमक झाले.
सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांनी पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करत “गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही जीव देऊ” असा इशारा देण्यात आला. काही वेळातच वातावरण अधिक तापलं आणि उपस्थित नागरिकांमध्येही खळबळ उडाली.
अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच संबंधित महिला आणि तिच्या मुलाने अचानक अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच पोलीस कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
मात्र, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने तसेच होमगार्ड जवानांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेत आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
गोंधळात व्यक्तीचा मृत्यू
दरम्यान, पोलीस ठाण्यासमोरील या गोंधळादरम्यान आणखी एक दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल रावसाहेब खर्चन (वय 45, रा. आखेगाव, ता. शेवगाव) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. ते अचानक जमिनीवर कोसळल्याने उपस्थितांमध्ये घबराट निर्माण झाली.
पोलिसांनी तातडीने त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर वातावरण आणखी गंभीर बनलं. पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी वाढली आणि काही काळ तणाव निर्माण झाला.
महिलेचे गंभीर आरोप
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित महिला आणि तिच्या मुलाची समजूत काढली. त्यानंतर महिलेला लेखी तक्रार देण्याचं आवाहन करण्यात आलं.
महिलेनं पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत. शेजाऱ्यांशी शेतीच्या कारणावरून जुना वाद सुरू असल्याचा दावा करत त्या वादातून सातत्याने त्रास दिला जात असल्याचं तिने नमूद केलं आहे.
मध्यरात्री घरावर हल्ल्याचा आरोप
महिलेच्या तक्रारीनुसार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री काही व्यक्तींनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. घराच्या खिडकीला लावलेली नेट पेटलेली दिसल्याने महिला आणि तिची आई बाहेर आल्या. त्याचवेळी काही आरोपी घरात घुसले आणि मारहाण तसेच शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपींनी महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना गंभीर धमक्या दिल्या. याशिवाय जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचाही धक्कादायक आरोप महिलेनं केला आहे. या आरोपांमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
लाखोंची चोरी झाल्याचा दावा
महिलेच्या फिर्यादीत आरोपींवर चोरीचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. घरातील सुमारे तीन लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरी करून नेल्याचा दावा करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, या प्रकरणाचे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये असल्याचं महिलेनं सांगितलं आहे. आरोपींनी ते मोबाईलही हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जातीवाचक शिवीगाळ आणि धमक्या
तक्रारीत आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
महिलेनं किलबिले कुटुंबातील सदस्यांसह एकूण 16 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पीडित महिलेनं गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता का? पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर आत्मदहनाचा प्रयत्न टळला असता का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.तथापि, पोलिसांनी प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळल्याचंही अनेकांनी नमूद केलं आहे. आत्मदहनाचा प्रयत्न रोखण्यात पोलिसांना यश आलं नसतं तर परिस्थिती आणखी भीषण होऊ शकली असती.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
या घटनेमुळे पाथर्डी परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. गंभीर आरोप, आत्मदहनाचा प्रयत्न आणि एका व्यक्तीचा मृत्यू या सर्व घटनांमुळे नागरिक हादरले आहेत.सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
