Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा जाहीर पाठिंबा; “हा राजकारणाचा नव्हे, देशाच्या भवितव्याचा प्रश्न”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन करणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजीत दीपके आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून, याकडे केवळ राजकीय दृष्टीकोनातून न पाहता देशाच्या भविष्याचा प्रश्न म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले.
अभिजीत दीपके हे गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभर विविध ठिकाणी आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेला खुलेपणाने समर्थन देत आंदोलनाला नैतिक पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी एका महत्त्वाच्या विषयासाठी येथे आलो आहे. अनेक लोक या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांनी जो मुद्दा उचलला आहे, तो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटले, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, पण सरकारने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सरकारचे लक्ष लोकप्रतिनिधी फोडण्यामध्ये आणि राजकीय घडामोडींमध्ये अधिक आहे.”
ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. “विद्यार्थ्यांचे नशीब फुटले आहे. देशातील तरुणांचा विश्वास डळमळीत झाला आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे. त्यामुळेच मी सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Related News
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “वांगचुक मला भेटून गेले होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा देशाच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे. ते गेल्या 16 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. चार दिवसांपूर्वी खासदार अरविंद सावंत त्यांना भेटून आले. मी स्वतः त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि आंदोलन थांबवण्याची विनंती केली. देशाला तुमची गरज आहे, असे मी त्यांना सांगितले. मात्र सरकारला त्यांच्या योगदानाची गरजच नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.”
20 तारखेला अभिजीत दीपके यांनी मोठ्या मोर्चाचे आयोजन केल्याची माहितीही ठाकरे यांनी दिली. या मोर्चाबाबत दीपके यांनी गंभीर आरोप केल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, “दीपकेंचा दावा आहे की, त्यांच्या आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी काही गुंड सोडले जाणार आहेत आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रकार अत्यंत हिणकस आणि नीच प्रवृत्तीचा आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. आंदोलन दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक ठरेल.”
उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. “मी कोणालाही पक्षाचे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी व्हा असे सांगत नाही. पण हा देशातील युवकांच्या भविष्याचा प्रश्न आहे. अभिजीत दीपके शिकलेल्या तरुणांचा आवाज बुलंद करत आहेत. हा केवळ एका पक्षाचा किंवा एका व्यक्तीचा मुद्दा नाही, तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, “सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके हे स्वतःसाठी लढत नाहीत. ते देशातील विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी लढत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. हा राजकारणाचा विषय नाही, तर देशाच्या भवितव्याशी संबंधित विषय आहे.”
उद्धव ठाकरे यांनी सर्व राज्यांतील राजकीय पक्षांना विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याचे आवाहन केले. “प्रत्येक पक्षाने आपल्या राज्यात विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. देश जागा झाला नाही, तर बेफिकीर सरकार अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करत राहील. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांचे मानसिक ताणतणाव आणि पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेले प्रश्न यामुळे विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळाल्याने या आंदोलनाला आणखी राजकीय आणि सामाजिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी 20 तारखेला होणाऱ्या मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या आंदोलनावर केंद्र सरकार आणि इतर राजकीय पक्षांची भूमिका काय असेल, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/vinayak-raut-took-13-bags-full-of-gold-and-silver-to-sunevar-serious-allegations/
