पुणे : लोहगड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. मृत केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांसह दोन्ही बाजूंचे वकील, पोलीस अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही 3 जुलैपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी न्यायालयात काय मांडलं?
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, प्राथमिक तपासात केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, या कटामध्ये आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास अद्याप बाकी आहे. कट नेमका कुठे आणि कसा रचला गेला, याचाही तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
याशिवाय चेतन चौधरीला घटनास्थळी नेऊन सिया गोयलप्रमाणे घटनाक्रमाची पुनर्रचना (Recreation) करायची असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तपासादरम्यान लोहगड परिसरातील अनेक व्यक्तींशी चौकशी करण्यात आली असून आणखी माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
Related News
पासपोर्ट, मोबाईल आणि कपड्यांचा तपास
सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, बाली येथे प्री-वेडिंग शूटला जाण्याबाबत मतभेद झाले होते. या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे फाडलेले पासपोर्ट शोधायचे आहेत. तसेच आरोपींनी आधी लोहगडावर जाऊन रेकी केली होती का, याचाही तपास सुरू आहे.
केतन अग्रवाल यांचा मोबाईल उशिराने पोलिसांच्या हाती लागला असून त्यामधील माहिती पुनर्प्राप्त (Recover) करणे आवश्यक आहे. आरोपींकडून काही माहिती लपवण्यात आल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला. चेतन चौधरीने घटनावेळी घातलेले कपडे अद्याप जप्त करायचे असल्याने त्याचीही गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारी वकिलांचा जोरदार युक्तीवाद
सरकारी वकिलांनी पोलिसांच्या मागणीला पाठिंबा देत सांगितले की, सिया गोयलसोबत घटनाक्रमाची पुनर्रचना झाली असली तरी चेतन चौधरीसोबत ती अद्याप झालेली नाही. दोन्ही आरोपींना एकत्र घेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पुनर्रचना करणे तपासासाठी आवश्यक आहे.
तसेच या प्रकरणात तिसरी व्यक्ती सहभागी होती का, कट नेमका कुठे रचण्यात आला, हत्या करण्याचा सराव कुठे करण्यात आला आणि घटनावेळी वापरण्यात आलेले कपडे जप्त करणे आवश्यक असल्याचे सांगत सरकारी पक्षाने सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
बचाव पक्षाचा पोलिस कोठडीला विरोध
दोन्ही आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीला तीव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आवश्यक चौकशी, पंचनामे आणि घटनाक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुढील तपास हा मुख्यतः तांत्रिक स्वरूपाचा असून त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही.
बचाव पक्षाने पोलिसांनी यापूर्वीही रिमांड वाढवताना याच कारणांचा आधार घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा त्याच कारणांवर पोलीस कोठडी मागणे योग्य नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
सियाच्या वकिलांनी अटकेवर उपस्थित केले प्रश्न
सिया गोयलचे वकील विपुल दुष्यंम यांनी अटकेच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, अटकेची कारणे आणि अटकेचे आधार (Ground of Arrest) यामध्ये स्पष्ट फरक आहे. सियाच्या अटकेसाठी नमूद करण्यात आलेली कारणे आणि चेतन चौधरीच्या अटकेतील कारणे जवळपास सारखीच असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
अटक करताना कायदेशीर प्रक्रिया योग्य प्रकारे पाळली गेली का, यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच सध्या या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मीडिया ट्रायल सुरू असल्याचा आरोप करत न्यायालयापूर्वी तपासाची माहिती माध्यमांपर्यंत कशी पोहोचते, याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
चेतन चौधरीच्या वकिलांचा प्रतिवाद
चेतन चौधरीचे वकील राम शहाणे यांनीही पोलिसांच्या मागणीला विरोध करत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये चेतनचा उल्लेख अत्यंत मर्यादित आहे. तसेच सियाच्या जबाबावरच चेतनचा सहभाग सांगितला जात आहे.
घटनास्थळी चेतनने घातलेली पँट जप्त करायची असल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी हुडी, मोबाईल आणि वाहन आधीच जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी पँट का जप्त करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मोबाईल फोन सियाकडे असल्याचे पोलिस सांगत असताना त्यासाठी चेतनच्या पोलीस कोठडीची गरज कशी काय भासते, असाही प्रश्न त्यांनी विचारला. पोलिसांनी मागणी केली असती तर संबंधित कपडे स्वतःहून उपलब्ध करून दिले असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘हत्या की अपघात?’ बचाव पक्षाचा महत्त्वाचा मुद्दा
चेतनच्या वकिलांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, केतन अग्रवाल यांचा मृत्यू दरीत पडल्याने झाला. केवळ मृताच्या कुटुंबीयांचा संशय असल्यामुळे या घटनेला थेट हत्या म्हणता येणार नाही. तपास पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
कोर्टात सियाचे वक्तव्य
सुनावणीदरम्यान सिया गोयलने न्यायालयाची परवानगी घेऊन स्वतः बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने स्पष्टपणे सांगितले की, विपुल दुष्यंम हेच आपले वकील आहेत, तर आशुतोष श्रीवास्तव आपले वकील नसल्याचे तिने न्यायालयात स्पष्ट केले.
या वक्तव्यानंतर काही काळ न्यायालयात चर्चेला उधाण आले.
न्यायालयाचा निर्णय
दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची सात दिवसांची मागणी पूर्णपणे मान्य केली नाही. मात्र, तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आता या कालावधीत पोलिसांकडून घटनाक्रमाची पुनर्रचना, डिजिटल पुरावे, मोबाईलमधील माहिती, कपड्यांची जप्ती आणि कटामध्ये इतर कोणाचा सहभाग होता का, याबाबतचा तपास अधिक वेगाने केला जाणार आहे.
तपासातून पुढे कोणते नवे पुरावे समोर येतात आणि या प्रकरणाला आणखी कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आह
read also : https://ajinkyabharat.com/prepare-batatyachi-bhaji-khaun-kuddha-aalaya-in-5-steps/
