अकोला शहरातील खदान परिसरातील ख्रिश्चन कॉलनी येथे असलेल्या सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये गुरुवारी (25 जून) सकाळी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अब्दुल जमीर अब्दुल बशीर (वय 40, रा. महान) यांनी शाळेच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खदान परिसरासह महान गावात शोककळा पसरली असून शिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पानांची सुसाईट नोट जप्त केली असून, त्यामध्ये शाळेचे अध्यक्ष जावेद अहमद खान जब्बार खान, निलंबित मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद आणि शिक्षक मतीन खान सालार खान यांच्यावर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसून, पोलिस तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
2009 पासून शिक्षक म्हणून सेवा
मिळालेल्या माहितीनुसार, महान येथील रहिवासी अब्दुल जमीर अब्दुल बशीर हे सन 2009 पासून खदान येथील ख्रिश्चन कॉलनीतील सानिया उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या 12 ते 13 वर्षांपासून शाळेत जावेद अहमद जमीर अहमद हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.सुसाईट नोटमध्ये मृतकाने असा दावा केला आहे की, मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद यांनी विविध वेळी कोऱ्या कागदावरही त्यांची स्वाक्षरी घेतली होती.
Related News


मुख्याध्यापक निलंबित झाल्यानंतर प्रभारी पदाचा भार
सुसाईट नोटनुसार, शाळेचे अध्यक्ष जावेद अहमद खान जब्बार खान आणि मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद यांच्यात अंतर्गत वाद झाला होता. त्यानंतर अध्यक्षांनी मुख्याध्यापकांना निलंबित केले आणि प्रभारी मुख्याध्यापकपदाचा कार्यभार अब्दुल जमीर अब्दुल बशीर यांच्याकडे सोपविण्यात आला.
मृतकाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे आधीच बी.एल.ओ. (BLO) ची जबाबदारी होती. तरीही त्यांची इच्छा नसताना प्रभारी मुख्याध्यापकपद स्वीकारावे लागले आणि त्यामुळे कामाचा व मानसिक ताण वाढला.
13 लाखांच्या कर्जामुळे वाढला ताण
सुसाईट नोटमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 13 लाख रुपयांचे बँक कर्ज.मृतकाने लिहिल्यानुसार, निलंबित मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 13 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी अब्दुल जमीर अब्दुल बशीर यांची जामिनदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात आली होती.
मुख्याध्यापक निलंबित झाल्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. परिणामी बँकेकडून जामिनदार म्हणून अब्दुल जमीर अब्दुल बशीर यांना वारंवार नोटिसा पाठविण्यात येत होत्या.मृतकाने सुसाईट नोटमध्ये असा दावा केला आहे की, त्यांनी जावेद अहमद जमीर अहमद यांना कर्ज फेडण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी “मी निलंबित झालो आहे. मी ती रक्कम भरणार नाही. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा.” असे उत्तर दिले.
या घटनेमुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, नोकरी आणि आर्थिक परिस्थितीबाबत आपण अत्यंत चिंतेत असल्याचेही मृतकाने लिहिले आहे.
लॉकरची चावी व कागदपत्रांबाबतही आरोप
सुसाईट नोटमध्ये मृतकाने शाळेचे अध्यक्ष जावेद अहमद खान जब्बार खान यांच्यावर आणखी काही गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्या म्हणण्यानुसार, अध्यक्षांनी लॉकरची चावी त्यांच्याकडून घेऊन त्यातील महत्त्वाची कागदपत्रे बाहेर काढली आणि त्यांच्यावर दबाव टाकला.
तसेच, निलंबित मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद यांनी माहिती अधिकार (RTI) अंतर्गत वारंवार माहिती मागितली होती. मात्र शाळेचे अध्यक्ष जावेद अहमद खान जब्बार खान यांनी ती माहिती देऊ नये, असा दबाव त्यांच्यावर आणल्याचा दावा सुसाईट नोटमध्ये करण्यात आला आहे.
बोगस विद्यार्थी आणि दोन शिक्षक नियुक्तीचा आरोप
सुसाईट नोटमध्ये अत्यंत गंभीर आरोप करताना मृतकाने म्हटले आहे की, शाळेचे अध्यक्ष जावेद अहमद खान जब्बार खान आणि निलंबित मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद यांनी संगनमत करून इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत काही बोगस विद्यार्थ्यांची नोंद केली. तसेच दोन बोगस शिक्षकांची नियुक्ती करून शासनाची दिशाभूल करण्यात आली.
यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती मागितली जात असल्याने ती बाहेर जाऊ नये म्हणून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सुसाईट नोटमध्ये तिघांना जबाबदार ठरवले
मृतकाने आपल्या सुसाईट नोटमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, आपण दोन्ही बाजूंनी मानसिक दबावाखाली होतो आणि आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता.
तसेच आपल्या आत्महत्येसाठी खालील तिघांना जबाबदार धरले आहे—
- जावेद अहमद खान जब्बार खान (शाळा अध्यक्ष)
- जावेद अहमद जमीर अहमद (निलंबित मुख्याध्यापक)
- मतीन खान सालार खान (शिक्षक)
हे आरोप सुसाईट नोटमधील मजकुरावर आधारित असून त्यांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
मोठा परिवार पोरका
मृतक अब्दुल जमीर अब्दुल बशीर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून घटनास्थळावरून मिळालेली दोन पानांची सुसाईट नोट जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सुसाईट नोटमधील सर्व आरोपांची पडताळणी केली जात आहे.
टीप : या वृत्तातील शाळा अध्यक्ष जावेद अहमद खान जब्बार खान, निलंबित मुख्याध्यापक जावेद अहमद जमीर अहमद आणि शिक्षक मतीन खान सालार खान यांच्यावरील सर्व आरोप हे मृतकाच्या कथित सुसाईट नोटमधील मजकुरावर आधारित आहेत. संबंधित व्यक्तींची बाजू अद्याप समोर आलेली नाही. पोलिस तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल.
