अकोट : 23 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोट शहरातील गजानन नगर परिसरातील शेखपुरा आणि श्रीराम नगर भागात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घरातील अन्नधान्य कपडे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पाण्यात भिजल्याने अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. काही दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या मान्सूनपूर्व नालासफाईकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. नाल्यांमध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आठवडी बाजार परिसरात साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे.
दरम्यान उपमुख्य अधिकारी धनंजय दहादडे यांनी रात्री आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवून नागरिकांना मदत करण्यात आल्याची माहिती दिली. बाधितांचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच नाले आणि ड्रेनेजची तातडीने साफसफाई करून औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
