वडिलांच्या स्मृतीसाठी मुलांनी उभारलं भव्य स्मारक; भोरमधील बुदगुडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श
आजच्या काळात संपत्ती, जमीन आणि वारसाहक्कावरून कुटुंबांमध्ये वाद होताना दिसतात. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की नाती तुटतात आणि कुटुंब न्यायालयाच्या पायऱ्या चढताना दिसते. मात्र पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाबवडी गावात एका कुटुंबाने समाजासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. वडिलांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाटण्या किंवा वादाऐवजी त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून मुलांनी घराच्या अंगणातच भव्य स्मारक उभारलं आहे. या अनोख्या कृतीची सध्या संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
भाबवडी गावचे प्रथम सरपंच कै. ज्ञानोबा दगडोबा बुदगुडे (पाटील) हे गावात अत्यंत आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्त्व होते. शेती, समाजकार्य आणि ग्रामविकास यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी आयुष्यभर गावासाठी काम करताना माणुसकीची जपणूक केली. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी दिली. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आगळावेगळं स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला.
मात्र या स्मारकाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, कै. ज्ञानोबा बुदगुडे यांच्या आयुष्याशी घट्ट जोडलेल्या त्यांच्या आवडत्या ‘सर्जा-राजा’ या बैलजोडीचेही फायबरचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात आले आहेत. शेतीवर प्रेम करणाऱ्या ज्ञानोबा बुदगुडे यांना ही बैलजोडी अत्यंत प्रिय होती. तसेच घराचा विश्वासू राखणदार असलेल्या ‘रॉकी’ या श्वानाचाही पुतळा येथे उभारण्यात आला आहे. त्यामुळे हे स्मारक केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित न राहता त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाचं प्रतीक बनलं आहे.
या स्मारकाच्या प्रतिष्ठापनेनिमित्त भाबवडी गावात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी श्री रानजाई माता देवीचा अभिषेक, ग्रामदैवतांची पूजा आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. गावातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यानंतर दुपारी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरापासून ते मूर्ती स्थापना स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोष यामुळे संपूर्ण गाव उत्साहाने भारावून गेलं होतं. अनेक ग्रामस्थांनी या सोहळ्याला “भावनांचा उत्सव” असं वर्णन केलं.
सायंकाळी मूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाबवडी आणि खानापूर येथील ग्रामस्थ मंडळांनी सुश्राव्य भजनांचं सादरीकरण केलं. या कार्यक्रमामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. संपूर्ण सोहळ्याचं नेटके नियोजन ज्ञानोबा माऊली सहारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं.
या स्मारकामुळे बुदगुडे कुटुंबाविषयी ग्रामस्थांच्या मनात आणखी आदर निर्माण झाला आहे. अनेक जण हे स्मारक पाहण्यासाठी खास भाबवडी गावात येत आहेत. सोशल मीडियावरही या अनोख्या कृतीचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. “आजच्या काळात अशी मुलं दुर्मिळ आहेत”, “वडिलांविषयीचं खरं प्रेम म्हणजे हेच” अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, समाजात वाढत्या कौटुंबिक वादांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वडिलांच्या निधनानंतर अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेवरून वाद निर्माण होतात. मात्र बुदगुडे बंधूंनी वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी उचललेलं हे पाऊल समाजाला एक सकारात्मक संदेश देणारं ठरत आहे.
कुटुंबातील नात्यांना जपणं, आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांच्या संस्कारांची जपणूक करणं किती महत्त्वाचं आहे, हे या घटनेतून स्पष्ट होतं. त्यामुळेच भाबवडी गावातील हे स्मारक आता केवळ एक वास्तू राहिलेलं नाही, तर ते संस्कार, प्रेम आणि कृतज्ञतेचं प्रतीक बनलं आहे.
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात बुदगुडे कुटुंबाने दिलेला हा आदर्श अनेकांना नात्यांची खरी किंमत समजावून सांगणारा ठरत आहे. म्हणूनच या कुटुंबाचं कौतुक केवळ भोर तालुक्यापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/jalgawati-lodge-war-lover-couple-attempts-suicide-25-year-old-youth-dies/
