वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील इंडियन पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी झालेल्या गर्दीतून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. डिझेलसाठी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. याच दरम्यान, रांगेत पुढे जाण्यावरून काही वाहनचालकांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला आणि त्याचे रूप हाणामारीत झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त झालेल्या काही नागरिकांनी एकमेकांवर डिझेलचे डबे फेकत मारहाण केली. त्यामुळे पेट्रोल पंप परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेमुळे इंधन भरण्यासाठी आलेल्या इतर नागरिकांमध्येही घबराट पसरली. काहींनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकारात काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. वाढत्या गर्दीत नागरिकांनी संयम राखावा आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
