धुळे हादरलं! शनी अमावस्येच्या रात्री 2 जणांची हत्या, भोंदूबाबाचा काळा खेळ उघड?
अजय गर्दे, धुळे : राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शनी अमावस्येच्या रात्री घडलेल्या या थरारक घटनेत एका तरुणीचा आणि ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका कथित भोंदूबाबाला ताब्यात घेतलं असून, या घटनेमागे अंधश्रद्धा, काळी विद्या की वैयक्तिक वाद आहे, याचा तपास आता वेगानं सुरू झाला आहे.
धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस स्टेशन हद्दीत भडगाव रस्त्यावरील टेंभे फाट्याजवळ रविवारी सकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला एका महिलेची बॉडी पडल्याचं पाहताच पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच निजामपूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
Related News
लोकलमध्ये महिलेला बेल्टने मारहाण, 12 तासांत आरोपी अटकेत; म्हणाला ‘ती महिला नव्हती तर…’
32 सेकंदात 34 वार करून महिला शिक्षिकेची निर्घृण हत्या; CCTV मध्ये कैद थरार , भयंकर हत्याकांड!
इंजेक्शनची तुटलेली सुई 2.5 वर्षांच्या मुलाच्या कमरेत; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
अभिजीत दिपकेंच्या भेटीवरून महायुतीत खळबळ! शिंदेंनी संजय शिरसाट, बच्चू कडूंना झापलं?
Ashok Kharat : 100 रुपयांचे चिंचोके तब्बल 1 लाखांना विकले? ईडीच्या आरोपपत्रातून भोंदूबाबाचे धक्कादायक कारनामे उघड
कल्याण हत्याकांडातील 7 धक्कादायक खुलासे! प्रियकराची निर्घृण हत्या, मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये लपवला
‘सिया संस्कारी आहे असं सांगितलं होतं’; केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप, चौकशीची मागणी
मोठी राजकीय घडामोड! तटकरे, पटेलांनंतर पार्थ पवारही वर्षा बंगल्यावर; फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा?
स्नॅपचॅट Love Story: 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरने पलटला डाव; ओडिशाहून महाराष्ट्रात आलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या निर्णयाने खळबळ
प्राथमिक तपासात मृत तरुणीची ओळख जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय 25, रा. कासारे, ता. साक्री) अशी पटली. जयश्री या बजाज फायनान्स कंपनीच्या साक्री कार्यालयात काम करत होत्या. त्या विवाहित असून त्यांना एक लहान अपत्य असल्याची माहिती समोर आली आहे.
रात्री पतीला केला होता शेवटचा फोन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री या कामानिमित्त छडवेल परिसरात गेल्या होत्या. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या पतीला फोन करून “मी घरी येत आहे” असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी पतीला साक्री येथे घेण्यासाठी बोलावलं. मात्र, पती साक्रीत पोहोचल्यानंतर जयश्री यांचा मोबाईल बंद लागत होता.
रात्रभर शोध घेतल्यानंतर सकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. विशेष म्हणजे घटनास्थळी आढळलेल्या दुचाकीवर कोणतीही धडक किंवा अपघाताच्या खुणा नव्हत्या. तसेच मृत महिलेचे पैसे आणि इतर वस्तूही सुरक्षित अवस्थेत मिळून आल्या. त्यामुळे हा अपघात नसून हत्या असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
दुसऱ्या ठिकाणी तरुणाची बॉडी, दुहेरी हत्याकांड स्पष्ट
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच उभरांडी शिवारात आणखी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांचाही धक्का बसला. मृत तरुणाची ओळख अक्षय गंगाधर सोनवणे (रा. भाडणे, ता. साक्री) अशी झाली असून तो स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता.
एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह सापडल्याने संपूर्ण प्रकरण अधिक गूढ बनलं आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचा संशय व्यक्त केला असून, हे दुहेरी हत्याकांड असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भोंदूबाबा ‘भैय्या महाराज’ पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात पोलिसांनी योगेश खैरनार उर्फ भैय्या महाराज (रा. जैताणे) याला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीत तो गोसंवर्धन आणि भोंदुगिरीचं काम करत असल्याचं समोर आलं आहे. स्थानिक परिसरात तो स्वतःला धार्मिक आणि आध्यात्मिक शक्ती असलेला व्यक्ती म्हणून सादर करत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शनी अमावस्येच्या रात्री ही घटना घडल्याने अंधश्रद्धा आणि काळ्या विधींचाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे कोणत्याही कारणाला दुजोरा दिलेला नाही. आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
CCTV फुटेज तपासात महत्त्वाचे ठरणार
स्थानिक गुन्हे शाखेने देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. तपासासाठी परिसरातील रस्ते, पेट्रोल पंप, दुकाने आणि प्रतिष्ठानांवर बसवण्यात आलेले CCTV कॅमेरे तपासले जात आहेत. जयश्री आणि अक्षय शेवटचे कुठे दिसले? ते आरोपीच्या संपर्कात होते का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके काम करत आहेत.
मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सोशल मीडिया संवादाचाही तपास केला जात आहे. दोन्ही मृतांच्या नातेसंबंधांबाबतही पोलिस माहिती गोळा करत आहेत.
परिसरात भीतीचं वातावरण
या दुहेरी हत्याकांडामुळे साक्री तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः शनी अमावस्येच्या रात्री ही घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान, जयश्री आणि अक्षय यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही कुटुंबांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
तपास वेगात, पोलिसांचा दावा
निजामपूर पोलीस आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. पोलिसांनी “लवकरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. आरोपीचा या दोन्ही मृतांशी नेमका संबंध काय होता? हत्या का करण्यात आली? आणि या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का? याचा तपास सुरू आहे.
धुळे जिल्ह्यातील हे दुहेरी हत्याकांड सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलं असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
