पुण्यातील 33 ‘मिसिंग लिंक’ मार्गांमुळे ट्रॅफिकवर मोठा प्रहार! 450 किमी रस्ते विकासाने शहराचा होणार कायापालट

मिसिंग लिंक

Pune शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नव्याने विकसित होत असलेल्या परिसरांना उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यासाठी पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरभरातील तब्बल 33 ‘मिसिंग लिंक’ मार्गांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील दोन वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

महापालिकेकडून 450 किलोमीटर लांबीच्या विविध रस्त्यांचे बांधकाम आणि रुंदीकरण केले जाणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः बाणेर, वाकड, धायरी, कोंढवा, मुंढवा, विमाननगर, औंध आणि बालेवाडीसारख्या वेगाने वाढणाऱ्या परिसरांमध्ये दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यावर उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ संकल्पना पुढे आणण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. प्रशासनाने शहरातील असे मार्ग ओळखले आहेत, जे जोडले गेल्यास वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. या मार्गांमुळे मुख्य चौकांवरील दबाव कमी होऊन पर्यायी रस्ते उपलब्ध होतील.

Related News

या 33 मार्गांपैकी 11 प्रकल्पांची भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यातील दोन मार्गांवर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. महापालिकेचे उद्दिष्ट 2026 च्या अखेरपर्यंत किमान 10 महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्याचे आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

वाकड ते नवले पूल या महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींपैकी सुमारे 50 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित संपादन प्रक्रिया डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होईल, असा अंदाज आहे.

धायरी परिसरातही महत्त्वाचा मिसिंग लिंक मार्ग तयार करण्यात येणार आहे. सिंहगड रोडवरील सततची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामुळे नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असून सिंहगड रोडवरील ट्रॅफिकचा दबाव कमी होईल.

महापालिकेने ज्या 10 मार्गांचे काम 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. राजाराम पुलापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग चौकापर्यंतचा मार्ग, बाणेर ते पाषाण लिंक रोड, गणराज चौक ते कसपटे वस्ती मार्ग तसेच औंधमार्गे बालेवाडी स्टेडियमपर्यंतचा रस्ता यामुळे पश्चिम पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

याशिवाय गुंजन चौक ते कल्याणी नगर, व्हीआयटी महाविद्यालय ते कोंढवा, धायरी परिसरातील नवीन लिंक रोड, एबीसी चौक ते ताडीगुट्टा-एनएम मार्ग आणि मुंढवा रेल्वे पूल ते केशवनगर या मार्गांचाही विकास केला जाणार आहे. या रस्त्यांमुळे पूर्व आणि दक्षिण पुण्यातील वाहतूक अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही मार्गांवर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. एकलव्य महाविद्यालय ते कोथरूड मार्ग, बानेर पॅनकार्ड क्लब ते मुर्कुटे वस्ती मार्ग, न्यू एअरपोर्ट रोड ते विमाननगर मार्ग आणि चौधरी वस्ती फाउंटन रोड या रस्त्यांच्या कामामुळे भविष्यातील ट्रॅफिक व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.

किर्लोस्कर पूल ते मगरपट्टा दक्षिण मार्ग, सनसिटी रोड ते राष्ट्रीय महामार्ग, फनटाईम सिंहगड रोड ते कर्वेनगर रोड आणि नवले पूल ते भूमकर रोड सर्व्हिस रोड या मार्गांवरही विकासकामे सुरू आहेत. पुणे शहराच्या सर्व दिशांना जोडणारी ही रस्ते साखळी भविष्यात स्मार्ट आणि वेगवान वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे केवळ वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर शहरातील रिअल इस्टेट, व्यावसायिक विकास आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. नव्या मार्गांमुळे नागरिकांचा प्रवास वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे.

पुणे महानगरपालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील दोन वर्षांत हे मार्ग प्रत्यक्षात पूर्ण झाले, तर पुणे शहरातील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलू शकतो.

read also :  https://ajinkyabharat.com/oil-crisis-2026-hormuz-crisis-trumps-pushy-master-plan-for-5-crore-barrels/

Related News