10 दमदार चेहऱ्यांसह थलपती विजय यांची ऐतिहासिक शपथविधी; क्रिकेटरपासून अभिनेत्यापर्यंत कॅबिनेटमध्ये कोण कोण?

थलपती विजय

तामिळनाडूच्या राजकारणात आज ऐतिहासिक घडामोड घडली. लोकप्रिय अभिनेता आणि ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. सकाळी १० वाजता पार पडलेल्या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र, विजय यांच्या शपथविधीपेक्षाही अधिक चर्चा त्यांच्या मंत्रिमंडळातील चेहऱ्यांची होत आहे.

कारण, विजय यांनी पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत विविध क्षेत्रांतील व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. या यादीमध्ये अनुभवी राजकारणी, माजी IRS अधिकारी, डॉक्टर, डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट, युट्यूबर, क्रीडा प्रशासक आणि तरुण महिला नेतृत्वाचाही समावेश आहे. त्यामुळे “नव्या तामिळनाडूची नवी टीम” अशी चर्चा सुरू झाली आहे.

अनुभवी चेहऱ्यांवर विजय यांचा विश्वास

TVK सरकारमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सेंगोट्टैयन. AIADMK मधील अत्यंत ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आठ वेळा आमदार राहिलेल्या सेंगोट्टैयन यांनी जयललिता आणि EPS सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे सांभाळली होती. AIADMK मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी विजय यांच्या TVK मध्ये प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून दिली.राजकीय जाण आणि प्रशासनाचा अनुभव लक्षात घेता विजय यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related News

विजय यांचे ‘विश्वासू’ नेते

TVK चे सरचिटणीस एन. आनंद हे विजय यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते विजय यांच्या संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. पुडुचेरीतील माजी आमदार असलेल्या आनंद यांनी टी. नगर मतदारसंघातून विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.पक्षाची रणनीती, संघटन आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत आनंद यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

खेळ आणि राजकारणाचा अनोखा संगम

आधव अर्जुन हे नाव सध्या तामिळनाडूत चर्चेचा विषय बनले आहे. ऑल बास्केटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या अर्जुन यांनी क्रीडा क्षेत्रातून थेट राजकारणात उडी घेतली. विल्लीवक्कम मतदारसंघातून त्यांनी DMK च्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले.खेळाडू आणि तरुण मतदारांमध्ये त्यांची मजबूत पकड असल्यामुळे विजय यांच्या टीममध्ये त्यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.

सोशल मीडिया मास्टरमाइंडलाही मंत्रिपद

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हेच मोठे शस्त्र बनले आहे आणि याच क्षेत्रातील तज्ज्ञ सी.टी.आर. निर्मल कुमार यांनाही TVK सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. AIADMK आणि भाजपसाठी काम केलेल्या निर्मल कुमार यांनी विजय यांच्या पक्षासाठी डिजिटल स्वयंसेवकांची मोठी फौज उभी केली होती.

TVK च्या सोशल मीडिया मोहिमेच्या यशामागे त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

युट्यूबर ते मंत्री!

राज मोहन अरुमुगम यांची एंट्री ही सर्वाधिक आश्चर्यकारक मानली जात आहे. प्रसिद्ध युट्यूब चॅनेल ‘Put Chutney’ मुळे ते तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला.त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे तरुण मतदारांमध्ये TVK ची लोकप्रियता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आर्थिक धोरणांमध्ये महत्त्वाची भूमिका

‘ऑडिटर वेंकटरमण’ म्हणून प्रसिद्ध असलेले वेंकटरमण हे विजय यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांनी मायलापुर मतदारसंघातून मोठा विजय मिळवत भाजप आणि DMK या दोन्ही पक्षांना धक्का दिला.

पक्षाच्या आर्थिक नियोजनात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी राजकारणात

निवृत्त IRS अधिकारी अरुण राज यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागरी सेवांमध्ये प्रवेश केला होता. २०२५ मध्ये TVK मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवला.प्रशासनिक अनुभवामुळे त्यांना महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे.

टीव्ही डिबेटमधील आक्रमक चेहरा

मदुराय सेंट्रल मतदारसंघातून विजयी झालेले मुस्तफा हे TVK चे आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. टीव्ही चर्चांमधील त्यांची शैली आणि पक्षासाठी केलेले काम पाहता त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

सर्वात तरुण महिला आमदार

एस. कीर्तना या TVK च्या सर्वात तरुण आमदार ठरल्या आहेत. फक्त २९ वर्षांच्या कीर्तनाने सिवाकासी मतदारसंघातून विजय मिळवत मोठा राजकीय संदेश दिला. अत्यंत साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या कीर्तनाने पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम केले होते.महिला आणि युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचा विजय यांचा प्रयत्न त्यांच्या निवडीमधून स्पष्ट दिसतो.

“प्रभु सर”ची मोठी एंट्री

डॉक्टर असलेले टी.के. प्रभु हे लोकांमध्ये “प्रभु सर” म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी कारैकुडी मतदारसंघातून NTK प्रमुख सीमन यांचा पराभव करत सर्वांना धक्का दिला. आरोग्य क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांना आरोग्य खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे.

पारंपरिक राजकारणाला धक्का?

विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रांतील चेहऱ्यांना दिलेले स्थान. अभिनेता, डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट, डॉक्टर, युट्यूबर, क्रीडा प्रशासक आणि प्रशासनिक अधिकारी अशा विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना एकत्र आणून विजय यांनी पारंपरिक राजकारणाला मोठे आव्हान दिले आहे.

तामिळनाडूमध्ये आता “स्टार पॉवर” आणि “युथ कनेक्ट” यांच्या जोरावर TVK सरकार किती प्रभावी कामगिरी करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/problems-of-love-in-office-60-employees-office-romance-10-shocking-revelations-from-forbes-survey/

Related News