सोनाली बेंद्रे-गोल्डी बेहल जमीन वादात अडचणीत; मावळातील शेतकऱ्याची कोर्टात धाव, 20 एप्रिलला सुनावणी
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल सध्या एका जमीन वादामुळे चर्चेत आले आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील उकसान गावात खरेदी करण्यात आलेल्या शेतजमिनीवरून हा वाद निर्माण झाला असून, स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, २० एप्रिल रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उकसान येथील सुमारे ३० गुंठे शेतजमिनीवर चंद्रकांत शिंदे यांनी वडिलोपार्जित कुळ हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन १९५७ पूर्वीपासून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात होती. मात्र, कुळकायद्याचे उल्लंघन करून आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही जमीन विकली गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणात केवळ मालकी हक्काचा वादच नाही, तर संबंधित जमिनीवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. सुरुवातीला या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या या जमिनीवर कोणतेही बदल किंवा व्यवहार होऊ नयेत यासाठी मनाई आदेश (इंजंक्शन) देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या सर्व आरोपांवर सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. त्यांच्या वतीने वकील राजू शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, संबंधित जमीन ही सोनाली बेंद्रे यांच्या नावावर नसून त्यांचा या व्यवहाराशी थेट संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, या जमिनीच्या मालकीबाबतचा इतिहासही त्यांनी मांडला आहे. ८ जून १९६५ रोजी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अनेक वेळा तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी (SDO) स्तरावर अपील करण्यात आले, मात्र प्रत्येक वेळी निर्णय चंद्रकांत शिंदे यांच्या विरोधातच लागला. ऑक्टोबर २०२५ मध्येही मावळ तहसीलदारांनी त्यांची अपील फेटाळली होती.
वकील राजू शिंदे यांच्या मते, हे प्रकरण वारंवार उकरून काढले जात असून, त्यामागे आर्थिक स्वार्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. “केवळ पैसे उकळण्याच्या हेतूने हे प्रकरण पुन्हा पुन्हा पुढे आणले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
या संपूर्ण वादामुळे मावळ तालुक्यातील उकसान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे शेतकरी आपल्या हक्कासाठी लढा देत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील नामांकित व्यक्तींचं नाव या वादात आल्यानं प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे.
आता सर्वांचे लक्ष २० एप्रिल रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच या वादाला नेमकं कोणतं वळण मिळणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे जमीन व्यवहारांमधील पारदर्शकता, कायदेशीर प्रक्रिया आणि कुळ हक्क यासारखे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
read also:https://ajinkyabharat.com/banks-closed-for-14-days-in-april-customers-should-plan-in-advance/
