आखाती तणावात अडकलेल्या भारतीयांना परत आणा – आमदार हरिष पिंपळे यांची मागणी

हरिष पिंपळे

मुर्तिजापूर : इराण, इराक, कतर तसेच अमेरिकेसोबत वाढत चाललेल्या तणावामुळे आखाती देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर त्या देशांमध्ये शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय नागरिक अडकल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधत अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

विधान भवन, मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान आमदार पिंपळे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, इराण-इराक आणि इतर आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या परिस्थितीत महाराष्ट्रासह देशातील अनेक विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटक त्या देशांमध्ये अडकले असल्याचे समजत असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकार व परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार पिंपळे यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ‘ऑपरेशन गंगा’ राबवून हजारो भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यात आले होते. त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीतही केंद्र सरकारने पुढाकार घेऊन आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

Related News

यासाठी अडकलेल्या नागरिकांचा व्हिसा आणि पासपोर्ट डेटा वापरून त्यांचे लोकेशन शोधावे, संबंधित देशांतील भारतीय दूतावासांमार्फत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आवश्यक असल्यास विशेष विमानांची व्यवस्था करून त्यांना सुरक्षितपणे भारतात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आपल्या मतदारसंघातील तसेच देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत, केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून या गंभीर प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आमदार हरिष पिंपळे यांनी व्यक्त केली.

READ ALSO:  https://ajinkyabharat.com/national-science-day-celebrated-with-enthusiasm-at-st-pauls-academy-akot/

Related News