शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026” चे उद्घाटन केले. चार दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात आयुष शिक्षण, आयुर्वेदिक उपचारपद्धती, संशोधन आणि शिक्षकांच्या विषयांवर सखोल विचारमंथन होणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, “आरोग्यम् परमो सुखम्” ही आपल्या परंपरेतील संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची आहे. सशक्त राष्ट्र उभारण्यासाठी नागरिकांचे आरोग्य भक्कम असणे अत्यावश्यक आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या आधीपासून आयुर्वेद, योग यांसारख्या पारंपरिक पद्धतींनी समाजाचे आरोग्य जपले आहे. आपल्या शेतात, स्वयंपाकघरात आणि जंगलात औषधी वनस्पतींचा अमूल्य साठा उपलब्ध आहे, आणि या संपत्तीचे संरक्षण करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपतींनी औषधी वनस्पतींना केवळ उपचारांसाठी नव्हे, तर पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. आयुर्वेदिक औषधींची शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करते तसेच मातीची सुपीकता टिकवून ठेवते. यामुळे आरोग्य, आर्थिक आणि पर्यावरणीय संतुलन साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Related News
आरोग्य म्हणजे फक्त शरीराचेच नव्हे, तर मनाचेही स्वास्थ्य आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी योग, प्राणायाम आणि संतुलित दिनचर्येवर भर दिला. आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या आणि आहारविषयक नियम केवळ उपचारापुरते मर्यादित नसून निरोगी जीवनशैलीचा मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रपतींनी युनानी व होमिओपॅथी पद्धती भारतात उद्गम नसल्या तरी, आयुर्वेदासोबत त्या भारतीय आरोग्य व्यवस्थेत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. मागील दशकात केंद्र सरकारने आयुष क्षेत्रात विविध सुधारणा केल्या असून नवीन एम्स संस्थांमध्ये आयुष विभागाची स्थापना, शिक्षण पद्धतीतील बदल आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार औषधनिर्मितीसाठी दिशा-निर्देश तयार केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपतींनी आपल्या बालपणातील निसर्गसंपन्न जीवनाचा उल्लेख करत जंगलांचे नुकसान आणि औषधी वनस्पतींचा ऱ्हास याबाबत चिंता व्यक्त केली. “औषधी वनस्पती जपल्या तरच आपल्याला अपेक्षित आरोग्य लाभेल,” असे सांगत त्यांनी स्वस्थ भारत, सशक्त भारत घडविण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, आयुष मंत्री प्रतापराव जाधव, क्रीडा मंत्री रक्षा खडसे, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यादरम्यान आयुष शिक्षण, आरोग्यवर्धक उपचार, औषधी वनस्पतींचा संवर्धन, संशोधन तसेच शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीसाठी सखोल चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा या कार्यक्रमातील संदेश स्पष्ट होता – “सशक्त नागरिक सशक्त राष्ट्राचे मूलाधार आहेत,” आणि प्रत्येक नागरिकाने आपले आरोग्य जपणे, योग व आयुर्वेद यांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
