पुंडा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, पुंडा यांच्या वतीने संचालित श्री नंदिकेश्वर विद्यालयात आज इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी घुगे हिने सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. मंचा वर उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक राहुल मानकर सर तसेच शिक्षिका सुनंदा देवळे यांना दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमास औपचारिक प्रारंभ झाला.
या प्रसंगी प्रा. संतोष पुंडकर , अनिल बिहाडे , प्रमोद पुंडकर, प्रकाश चव्हाण , किरण आठवले , रोशनी कुलट तसेच शिक्षकेतर कर्मचारी दुर्योधन वानखडे आणि विकी अढाऊ उपस्थित होते.
Related News
कार्यक्रमादरम्यान इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत भावनिक मनोगते व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करत विविध करिअर संधींबाबत माहिती दिली तसेच आगामी दहावीच्या परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून आभार प्रदर्शन करण्यात आले. तसेच नववीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. विद्यार्थी व शिक्षकांनी आनंदाने आणि उत्साहाने स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
अशा प्रकारे अत्यंत आनंददायी, उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात निरोप समारंभ यशस्वीरीत्या संपन्न झाला.
