Hypersonic Missile : भविष्यातील ब्रह्मास्त्र; शत्रूंना थरकाप उडवणाऱ्या भारताच्या पहिल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची झलक

Hypersonic Missile

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर देशाची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगतीचे भव्य दर्शन घडले. या संचलनात भारताने प्रथमच आपल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची झलक दाखवत जगाचं लक्ष वेधून घेतलं. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) विकसित केलेले लाँग रेंज अँटी-शिप हायपरसोनिक ग्लाइड मिसाइल (LRAShM) हे भारतीय नौदलासाठी तयार करण्यात येत असून, त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रातील भारताची सामरिक ताकद अधिक भक्कम होणार आहे.

हायपरसोनिक तंत्रज्ञानामुळे ही क्षेपणास्त्रे प्रचंड वेगाने आणि अनियमित मार्गाने लक्ष्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे शत्रूच्या रडार प्रणालींना चकवा देत ती अचूक हल्ला करू शकतात. विशेषतः शत्रूंच्या युद्धनौका आणि विमानवाहू नौकांसाठी हे क्षेपणास्त्र मोठा धोका ठरणार आहे.

LRAShM ची वैशिष्ट्ये

Related News

  • रेंज : सुमारे १,५०० किलोमीटर

  • वेग : मॅक ८ ते मॅक १० (हायपरसोनिक) — १५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची क्षमता

  • प्रकार : हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल (HGV) — रॉकेटद्वारे उंचावर नेल्यानंतर ग्लाइड करत अनियमित मार्गाने लक्ष्य गाठते

  • पेलोड : विविध प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम

  • उद्देश : शत्रूंच्या युद्धनौका आणि विमानवाहू नौकांवर प्रभावी हल्ला; भविष्यात जमिनीवरील लक्ष्यांवरही हल्ला करण्याची क्षमता विकसित करण्याचा मानस

या क्षेपणास्त्राचा विकास हैदराबाद येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मिसाइल कॉम्प्लेक्समध्ये सुरू असून, हायपरसोनिक ग्लाइड व क्रूझ मिसाइल तंत्रज्ञानावर DRDO कडून वेगाने काम सुरू आहे.

महत्त्व काय?

हायपरसोनिक वेगामुळे शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळतो. रडार चुकवण्याची क्षमता आणि अचूकता यामुळे हे क्षेपणास्त्र सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हिंदी महासागर क्षेत्रात, विशेषतः चिनी नौदलाच्या पार्श्वभूमीवर, भारताची स्थिती अधिक मजबूत होणार आहे. भविष्यात या क्षेपणास्त्राची रेंज ३,००० ते ३,५०० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचं लक्ष्य DRDO ने ठेवले आहे.

हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील भविष्य मानले जात असून, या माध्यमातून भारताचा समावेश अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या निवडक देशांच्या पंक्तीत होणार असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

read also :  https://ajinkyabharat.com/celebrating-republic-day-enthusiastically-in-samyak-sambodhi/

Related News