अमरावती : शहरातील प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत पीडीएमसी जवाहर स्टेडियम परिसरात असलेल्या गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक २३ येथे मतदानादरम्यान ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच अचानक ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली होती.
या तांत्रिक अडचणीमुळे सुमारे २५ ते ३० मिनिटे मतदान प्रक्रिया बंद राहिली. यंत्र कार्यरत नसल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना केंद्राच्या बाहेरच थांबावे लागले. त्यामुळे काही काळ मतदान केंद्र परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली, तर काहींनी मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका उपस्थित केल्या.
घटनेची माहिती मिळताच निवडणूक प्रशासनाने तात्काळ हालचाली करून तांत्रिक पथकाला घटनास्थळी पाचारण केले. यंत्राची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. जवळपास अर्ध्या तासानंतर ईव्हीएम मशीन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली आणि मतदारांनी दिलासा व्यक्त केला.
Related News
नगरपरिषद निवडणुकीत घरून मतदान सुविधा उपलब्ध नाही
दरम्यान, या खोळंब्यामुळे सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही मतदार कामावर जाण्याच्या घाईत मतदान न करता परतल्याचीही माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रभागातील उमेदवारांनी निवडणूक प्रशासनाकडे निवेदन देत, ईव्हीएम बिघाडामुळे झालेल्या विलंबाची दखल घेऊन मतदानाची वेळ किमान ३० मिनिटांनी वाढवून द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र यावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
