प्रतिनिधी : देवानंद खिरकर
‘बालविवाह मुक्त भारत संकल्प अभियान – १०० दिवस’ आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमांअंतर्गत अकोट तालुक्यात महिला शिक्षिकांसाठी महिला व बालकांच्या कायद्यांविषयी सखोल माहिती देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दीष्ट शाळांमधील महिला शिक्षिकांना कायद्यांचा सखोल आढावा देणे आणि बालविवाह, बालअत्याचार व महिला सुरक्षिततेसंबंधी जागरूकता वाढवणे हे होते.
कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग, अकोला, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अकोला, तसेच गट शिक्षणाधिकारी कार्यालय, अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यांचल द स्कूल, अकोट येथे करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रोशनी बन्सल यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले, तर अध्यक्षस्थानी विद्यांचल द स्कूलच्या प्राचार्या शैलेजा त्रिवेदी होत्या.
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. नितेंद्र उंबरकर (मुख्य लोक अभिरक्षक, अकोला), प्रांजली जैस्वाल (सदस्य, बालकल्याण समिती), शुभांगी लाहुडकर (सुखाय फाउंडेशन, अकोला), ॲड. मनीषा भोरे (केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर, अकोला), वैभव तायडे (पोलीस उपनिरीक्षक, अकोट), डॉ. प्रीती कोगदे तसेच गट शिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी उपस्थित होते. त्यांनी सहभागी शिक्षिकांना कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आणि शाळांमध्ये बालविवाह व महिला व बालविकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या.
Related News
कार्यशाळेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम २०१२, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध अधिनियम २०१३, बाल न्याय अधिनियम २०१५, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम २००५ यांसह सायबर सुरक्षा व महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांविषयी सखोल माहिती देण्यात आली. या कायद्यांचा उद्देश, अंमलबजावणी पद्धती, तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया आणि शाळांमधील शिक्षकांच्या जबाबदाऱ्या यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेत अकोट तालुक्यातील ४१० महिला शिक्षिकांनी सहभाग नोंदविला. सहभागी शिक्षिकांनी विविध प्रश्न विचारून कायद्याची सविस्तर माहिती घेतली आणि त्यांच्या शाळांमध्ये बालविवाह व महिला व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन घेतले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. अनिता देशमुख यांनी केले, तर आभार रुपाली साबळे यांनी मानले.
कार्यशाळेत सहभागी शिक्षिकांनी या प्रकारच्या कायदे प्रशिक्षणाच्या उपयुक्ततेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे शिक्षकांच्या स्तरावरच बालविवाह प्रतिबंध, महिला व बालविकास योजना याबाबत अधिक जागरूकता येते, आणि यामुळे समाजातील बदल शक्य होतो.
