यवतमाळ, दि.1 .
”पंख ना हो तो उडने का हुनर, तो तालीमसे ही आता हैं,
सोच बदलो तो जग बदले, फिर आकाश छोटा हो जाता हैं.”
या लोकप्रिय शेर चा मतीतार्थ सांगत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे यांनी पोलिस भरतीपूर्व परीक्षेचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना अतिशय कमी शब्दात शिक्षण आणि सरावाचे महत्त्व सांगितले. प्रसंग होता महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग व तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे पोलिस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारोहाचा! या आनंददायी सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांसोबत प्रशिक्षणार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून रंगत आणली.
महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग व तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथे पोलिस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमाचा समारोप शनिवारी, (दि.31) ’निरोप समारंभा’ने झाला. या आनंददायी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष आणि डिक्कीचे राष्ट्रीय कौन्सिल व महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. सुगत वाघमारे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. विशाल जाधव, राज्य बाल हक्क आयोग चे माजी सदस्य तथा प्रसिद्ध वकील अॅड. संजय सेंगर, नियोजन विभागाचे सहाय्यक संशोधन अधिकारी श्री. संदीप सुडके, अकोला येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप अवचार, विधिज्ञ अॅड. दिनेश कवडे, नियोजन विभागाचे श्री. प्रवीण वानखडे, ’अजिंक्य भारत’ चे संचालक श्रीकांत पिंजरकर, यवतमाळ बाल कल्याण समितीचे सदस्य अनिल गायकवाड, अरविंद वानखडे, अश्वनी कुमार वानखडे, तिक्ष्णगत संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक राजेश चक्रनारायण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. सुगत वाघमारे म्हणाले की, ’यशस्वी होण्यासाठी केवळ नैसर्गिक प्रतिभा (पंख) पुरेशी नसते, तर त्यासाठी योग्य शिक्षण, प्रशिक्षण (तालीम) आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आणि दृढ निश्चयाची गरज असते.’ त्यांनी सांगितलेल्या चार ओळींच विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन गेल्या. राज्य बालहक्क आयोगाचे माजी सदस्य अॅड.संजय सेंगर यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देत जीवनात यशस्वी कसे व्हायचे यावर मार्गदर्शन केले.
Related News
त्यांनी सर्वच प्रशिक्षणार्थी परीक्षेत यशस्वी होतील असा आशावाद व्यक्त केला. जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.विशाल जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देत स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मानसिक ताण न घेण्याचे आवाहन केले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत माहिती दिली. तर प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप अवचार यांनी ’एक पोलिस बॉय’ म्हणून पोलिस खात्यातील कुटुंबाचे अनुभव, शिस्त आणि आवश्यक गुण यावर मार्गदर्शन केले. अभिनयातून व कवितेच्या ओळींमधून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेले कौशल्य आणि स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत माहिती दिली. त्यानंतर ’अजिंक्य भारत’चे संचालक श्रीकांत पिंजरकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक संशोधन अधिकारी श्री. संदीप सुडके, बाल हक्क समितीचे सदस्य अनिल गायकवाड आदींनीही यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणार्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेणार्या प्रकल्प व्यवस्थापक राजेश चक्रनारायण, सहयोगी जयंत राठोड व गणेश खडसे, महिला वसतिगृह अधीक्षक रेशमा राठोड, सुरक्षा रक्षक राजेंद्र भीतकर व बौद्धिक चाचणी परीक्षा प्रशिक्षक नीतेश मेश्राम आणि गोपाल शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी स्वप्नील टिकले, पल्लवी जावडेकर, अंजली राऊत, हिमांशू मेश्राम, नावेद खान, प्रशिक डोमे, रोहित तावडे आदींनी प्रशिक्षणादरम्यान आलेले अनुभव कथन केले.कार्यक्रमाचे संचालन नीतेश मेश्राम यांनी केले.
तिक्ष्णगत खरी ’केअर-टेकर’
याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांनी अनुभव कथन करताना ’तिक्ष्णगत’संस्था ही खरी ’केअर-टेकर’असल्याचे मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, प्रशिक्षणासाठी लागणारे आवश्यक साहित्य मागणी करताच प्रशिक्षणार्थ्यांना पुरविण्यातआले. शिवाय, तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. निवासी व्यवस्था उत्तम होती आणि विद्यार्थ्यांना भोजनापासून आरोग्यापर्यंतची सर्व काळजी प्रकल्प व्यवस्थापक व वसतिगृह अधीक्षकांनी घेतली. उत्तम दर्जाचे प्रशिक्षण मिळाल्याचे समाधान यावेळी प्रशिक्षणार्थ्यानी व्यक्त केले.
