नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून करोना काळात दिलेल्या लशीबाबत मोठी चर्चा आहे. आता याबाबत अपडेट समोर आली आहे. ॲस्ट्राजेनेका कंपनीने जगभरातून लस परत घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती मंगळवारी दिली. कंपनीने म्हटलंय, की युरोपमध्ये वॅक्सजेवरिया नावाने दिलेली लस मागे घेत आहे. टेलिग्राफने याबाबत माहिती दिली आहे. युरोपमध्ये वॅक्सजेवरिया नावाने दिलेली लस ही भारतात Covishield अर्थात कोविशिल्ड या नावाने लाँच करण्यात आली होती. भारतात करोना काळात हीच लस बहुतांश भारतीयांना देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एका न्यायालयात या लसीमुळे रक्त गोठण्याची शक्यता निर्माण होऊ शकते असं कबूल केलं होतं. त्यानंतर आता Covishield ही लस तयार केलेल्या ॲस्ट्राजेनेका या कंपनीने लस परत घेण्याचं मोठं पाऊल उचललं आहे.
ब्रिटनमध्ये ॲस्ट्राजेनेका कंपनीविरुद्ध अनेक आरोप करत प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. कंपनीची लस घेतल्यानंतर गंभीर आरोग्यविषयक आव्हानांचा दावा अनेकांनी केला आहे. पण कंपनीने मात्र लस मागे घेण्यामागे लसींचं मोठा साठा असल्याचं कारण सांगितलं आहे. लसींचा साठा भरपूर प्रमाणात असल्याने लसीच्या मागणीत घट झाली आहे, त्यामुळे लस मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. सध्या, कंपनीने केवळ युरोपियन युनियन असलेल्या देशांमधून ही लस मागे घेण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र टेलिग्राफने आपल्या अहवालात हे इतर देशांमध्येही केलं जाऊ शकतं, असं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
लस मागे घेण्याच्या चर्चांवर कंपनीने बोलताना सांगतिलं, की कोविड-१९ लशींचे अनेक प्रकार विकसित केले गेले असल्याने, अद्ययावत लस अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे लशींच्या मागणीत घट झाली आहे, जी उत्पादित किंवा पुरवठा केली जात नाही. ॲस्ट्राजेनेकाने ५ मार्च रोजी लस मागे घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर ७ मे पासून हे काम प्रभावीपणे सुरु झालं.
Related News
ॲस्ट्राजेनेका कंपनीविरोधात केस
ॲस्ट्राजेनेका कंपनीवर ब्रिटनमध्ये कारवाई सुरू आहे. कंपनीविरोधात दाखल केलेल्या खटल्यात असा दावा केला आहे, की कंपनीच्या लशीमुळे मृत्यू आणि गंभीर शारीरिक दुष्परिणाम, हानी झाली आहे. ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीने ॲस्ट्राजेनेकाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खटला दाखल करण्यात आला आहे.
कंपनीविरोधात दाखल केलेल्या खटल्यात असं म्हटलंय, की लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार झाली, त्यामुळे मेंदूला गंभीर इजा झाली. सुरुवातीला कंपनीने लशीमुळे कोणताही आजार होण्याची बाब नाकारली, मात्र नंतर न्यायालयात लशीमुळे टीटीएस नावाचा अतिशय दुर्मिळ आणि गंभीर आजार होऊ शकतो, ही बाब मान्य केली.
भारतातूनही परत मागवल्या जाणारा लशी?
कंपनीने युरोपमधील लस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता ॲस्ट्राजेनेका याच कंपनीची भारतात दिलेली कोविशील्ड नावाची लस देखील मागे घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे. कोविशील्डची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली आहे. ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. अशा परिस्थितीत सीरमला देखील ही लस मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. ब्रिटनमधील प्रकारानंतर आता भारतातही या लसीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.