पाकव्याप्त काश्मीरमधील जनताच भारतात विलिनीकरणाची मागणी करेल

राजनाथ सिंह

नवी दिल्ली : ‘पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही. मात्र, सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचीही गरज नाही. तेथील नागरिक काश्मीरमधील विकास पाहून स्वत:च भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील’, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. राजनाथ यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत जम्मू-काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान, चीनशी संबंध, घटनाबदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती आदी विषयांवर भाष्य केले.

‘जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. तिथे आर्थिक विकास वेगाने होत असून, शांतताही नांदू लागली आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारताला बळाचा वापरच करावा लागणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील जनता स्वत:च भारतात सामील होण्याची मागणी करतील. अशी मागणी आता होऊ लागली आहे’, असे राजनाथ सिंह म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर आमचे होते, आहे आणि राहील, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा काश्मीरमध्ये लागू करण्याची आवश्यकताच उरणार नाही, अशी स्थिती काश्मीरमध्ये निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच याबाबतचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याबाबत निश्चित कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला.

Related News

सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया कोणत्याही स्थितीत थांबायला हव्यात, असे राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला बजावले. या दहशतवादी कारवायांवर भारताची करडी नजर असेल, असे सांगताना राजनाथ यांनी दहशतवादाबाबत सहनशून्य भूमिकेचा पुनरुच्चार केला.

समुद्री चाच्यांविरोधात भारतीय नौदलाच्या कारवाईचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. एडनचे आखात, तांबड्या समुद्रात चाच्यांविरोधात कारवाई करीत नौदलाने व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजनाथ म्हणाले.

Related News