आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवर राणी मुखर्जीची स्पष्ट भूमिका; “निर्मात्यांना पटत नसेल तर बाहेर पडावं लागतं” बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत मोठी चर्चा पेटवली आहे. कोरिओग्राफर फराह खाननंतर आता अभिनेत्री राणी मुखर्जीनेही या मुद्द्यावर भाष्य करत स्पष्ट मत मांडले आहे. तिचं वक्तव्य ऐकल्यानंतर अनेकांना वाटतंय की हा अप्रत्यक्षपणेदीपिकावरच टोमणा आहे. दीपिकेने काही दिवसांपूर्वी ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ साधण्यासाठी आणि आरोग्य लक्षात घेऊन ८ तासांच्या शूटिंग शिफ्टची मागणी केली होती. मात्र या मागणीवर इंडस्ट्रीतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर काहींनी त्याला अव्यवहार्य म्हटलं. आता राणी मुखर्जीने या विषयावर आपलं मत व्यक्त केलं असून तिचं वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, “मी ‘हिचकी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होते, तेव्हा माझी मुलगी आदिरा फक्त 14 महिन्यांची होती. मी त्यावेळी स्तनपान करत होते. त्यामुळे मला शूटिंगसाठी जाण्यापूर्वी तिच्यासाठी दूध पंप करावं लागायचं. माझ्या घरापासून सेटपर्यंत पोहोचण्यासाठी दोन तास लागायचे. त्यामुळे सकाळी 6.30 वाजता घरातून निघायचे आणि पहिला शॉट 8 वाजता असायचा. माझं शूटिंग दुपारी 3 वाजेपर्यंत पूर्ण व्हायचं आणि मी घरी परतायचे.” राणी पुढे म्हणाली, “जर निर्मात्यांना काही समस्या नसेल, तर तुम्ही कमी वेळात काम पूर्ण करू शकता. पण जर त्यांना ते पटत नसेल, तर तुम्हाला चित्रपटाच्या बाहेर काढलं जाईल. त्यामुळे कोणीही तुमच्यावर काही थोपवत नाही. निर्णय तुमचा असतो.” राणी म्हणाली, “आज लोक अशा गोष्टींबद्दल उघडपणे बोलत आहेत म्हणूनच याची चर्चा होते आहे. मात्र प्रत्येक क्षेत्रात असेच आव्हान असतात. फक्त अभिनय क्षेत्रातच नाही, तर सर्वच ठिकाणी महिलांना काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन साधावं लागतं.” दीपिका पादुकोणने आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ या चित्रपटातून ती बाहेर पडल्याची बातमी समोर आली. या चित्रपटात ती साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत झळकणार होती. मात्र शूटिंगच्या वेळाविषयी मतभेद झाल्यानं दीपिकेनं हा प्रकल्प सोडल्याचं म्हटलं जातं. या निर्णयानंतर दीपिकेवर टीका आणि कौतुक दोन्ही होत आहे. अनेक महिला कलाकारांनी तिच्या पाठीशी उभं राहत “कामाचं वेळापत्रक मानवी असावं” असं सांगितलं, तर काही निर्मात्यांनी “चित्रपट हे सामूहिक काम असतं, त्यात लवचिकता आवश्यक असते” असं मत मांडलं. याआधी कोरिओग्राफर फराह खानने दीपिकेच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की “चित्रपट निर्मिती ही एक टीमवर्क आहे. शेकडो लोक एकत्र काम करतात. एखाद्या कलाकारासाठी वेळ मर्यादा ठेवणं इतरांवर अन्याय ठरेल.” या वक्तव्यानंतर दीपिका आणि फराह यांच्यात वाद निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. आता राणी मुखर्जीचं वक्तव्य आल्यानं हा मुद्दा आणखी चर्चेत आला आहे. राणीने ‘हिचकी’च्या शूटिंगदरम्यान मातृत्व आणि करिअरचा उत्तम समतोल साधला. तिने कमी वेळेत काम पूर्ण करण्याची योजना आखली आणि आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्यावर भर दिला. तिचं हे उदाहरण अनेक कार्यरत महिलांसाठी प्रेरणादायी ठरतं आहे. पूर्वी चित्रपट शूटिंग 12-14 तास चालायचं. मात्र आता OTT युगात आणि नवीन पिढीतील कलाकारांमुळे वर्क-लाईफ बॅलन्सवर अधिक भर दिला जातो. काही निर्माते 8-10 तासांच्या शिफ्टकडे वळले आहेत, पण सोशल मीडियावर राणी मुखर्जीच्या वक्तव्यावर लोकांचे वेगवेगळे प्रतिसाद येत आहेत. काहींनी म्हटलं, “राणीने सत्य सांगितलं. कोणीही कोणावर काही थोपवत नाही.” तर काही म्हणतायत, “दीपिकेचंही म्हणणं बरोबर आहे, आरोग्य आणि मानसिक संतुलन महत्त्वाचं.” या चर्चांमुळे बॉलिवूडमधील कामकाजाच्या पद्धतींवर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. दीपिका पादुकोणच्या मागणीने आणि राणी मुखर्जीच्या स्पष्ट भूमिकेने बॉलिवूडमध्ये कामकाजाचे नियम, शिफ्टचे तास आणि कलाकारांच्या आरोग्याबद्दलची जागरूकता पुन्हा केंद्रस्थानी आणली आहे. यामुळे पुढील काळात इंडस्ट्रीत अधिक संवेदनशील आणि समतोल कामकाज पद्धती अवलंबल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
read also:https://ajinkyabharat.com/aichya-letter-dadlele-secret/
