कोथरूडमध्ये एक जण गंभीर जखमी

विद्येचं की गुन्ह्यांचं माहेरघर?

पुणे :नाना पेठेतील गँगवार आणि आयुष कोमकर हत्याकांडानंतर अजूनही पुणेकर पूर्ण सावरलेले नसतानाच पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे. कोथरूडमधील शिंदे चाळ परिसरात मध्यरात्री घडलेल्या गोळीबारात प्रकाश दुरगुडे नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीने घडवून आणल्याचा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये रोहित आखाड, गणेश राऊत, मयुर कुंभारे आणि मुसा शेख यांचा समावेश आहे. प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, कारला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून या टोळीने संतापून सरळ गोळीबार केला.

गोळ्यांचा वर्षाव, पुणेकर दचकले

प्रकाश दुरगुडे यांच्यावर आरोपी मयुर कुंभाराने धडाधड तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या मानेला व मांडीला लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. रात्री अचानक झालेल्या या गोळीबाराने कोथरूड परिसरातील नागरिक दचकून उठले. सकाळी घटनास्थळी पडलेले रक्त पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले आणि “आम्ही अजूनही घाबरलो आहोत” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पुण्यात सुरक्षेचा प्रश्न

यापूर्वी ५ सप्टेंबरला नाना पेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या झाली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले होते. ते प्रकरण अद्याप शांत झालेले नसतानाच पुन्हा एका गोळीबाराने पुण्याची सुरक्षा धोक्यात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मध्यरात्री निवासी भागात गुंडांनी फायरिंग करण्याचे धाडस दाखवल्याने “पुणेकर सुरक्षित आहेत का?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. पोलिसांनी मात्र आरोपींना लवकरच गजाआड करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

read also :https://ajinkyabharat.com/mendu-khana-aibachi-panic/