मध्य प्रदेशातील Bhopal येथे घडलेल्या मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या 31 वर्षीय मॉडेल ट्विशा शर्माचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले जात होते, मात्र आता समोर आलेल्या CCTV फुटेज, सोशल मीडिया चॅट्स आणि कुटुंबीयांच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
एम्सच्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार ट्विशाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण ट्विशाच्या माहेरच्यांनी हा दावा ठामपणे फेटाळून लावत, सासरच्यांनी हुंड्यासाठी तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
CCTV फुटेजमधील धक्कादायक चित्र
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्विशाच्या घरातील CCTV फुटेज. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजमध्ये ट्विशा घटनेच्या काही वेळ आधी घराच्या छताकडे जाताना दिसते. त्यानंतर जवळपास एका तासाने तिचा पती समर्थ सिंग आणि आणखी दोन व्यक्ती तिला जिन्यावरून बेशुद्ध अवस्थेत खाली आणताना दिसतात.
Related News
व्हिडिओमध्ये जिन्यावरच ट्विशाला CPR देण्याचाही प्रयत्न होताना दिसतो. मात्र, या संपूर्ण घटनेतील “त्या 60 मिनिटांमध्ये” नेमके काय घडले? हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. कारण या एका तासाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
मृत्यूची तारीख वेगळीच?
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे CCTV फुटेजमधील तारीख. व्हायरल फुटेजमध्ये घटना 10 मे रोजी घडल्याचे दिसत आहे. मात्र ट्विशाच्या कुटुंबीयांनी हा दावा चुकीचा असल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या मते, प्रत्यक्ष घटना 12 मे रोजी घडली होती. CCTV सिस्टीममधील वेळ आणि तारीख मुद्दाम बदलण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आणि तपास दिशाभूल करण्यासाठी ही छेडछाड करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यामुळे आता पोलिसांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. जर तारीख बदलण्यात आली असेल, तर त्यामागचे कारण काय? आणि नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता?
सोशल मीडिया चॅट्समुळे वाढला संशय
ट्विशाच्या कुटुंबीयांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, ट्विशाच्या व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया चॅट्समध्ये ती सतत तणावाखाली असल्याचे दिसून येते. ती मानसिक दबावाखाली राहत होती आणि सासरच्या लोकांकडून त्रास दिला जात असल्याचेही काही संदेशांमधून स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कुटुंबीयांच्या मते, लग्नानंतर ट्विशावर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले जात होते. हुंड्याच्या मागणीसाठी तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे तिचा मृत्यू हा आत्महत्या नसून नियोजित कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
सासरच्यांचा पलटवार
दुसरीकडे ट्विशाची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंग यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, ट्विशा मानसिक आजाराने त्रस्त होती आणि तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते.
त्यांच्या म्हणण्यानुसार, ट्विशाला ‘सिजोफ्रेनिया’ हा गंभीर मानसिक आजार होता. ती नियमित औषधोपचार घेत होती. औषधांचा परिणाम कमी झाल्यानंतर तिची प्रकृती बिघडायची. तिचे हात थरथरायचे आणि ती असामान्य वर्तन करायची, असा दावा त्यांनी केला.
इतकेच नाही तर ट्विशा गांजाचे सेवन करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र समर्थ सिंगवर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी पूर्णपणे नाकारले आहेत.
अवघ्या 5 महिन्यांत संसाराचा अंत
ट्विशा शर्मा आणि समर्थ सिंग यांचे लग्न 9 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत असल्याचे दिसत होते. मात्र काही महिन्यांतच नात्यात तणाव वाढल्याचे बोलले जात आहे.
कुटुंबीयांच्या मते, लग्नानंतर ट्विशाला सतत त्रास सहन करावा लागत होता. तिच्यावर मानसिक दबाव टाकला जात होता. त्यामुळे ती खूप तणावाखाली होती. अखेर तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब हादरले आहे.
पोलिस तपासावरही प्रश्नचिन्ह
या हाय-प्रोफाइल प्रकरणात आता पोलिस तपासावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. ट्विशाच्या कुटुंबीयांनी फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोलिस तपासात गडबड असल्याचा आरोप केला आहे. CCTV फुटेजमधील वेळ आणि तारीख तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवले असून डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि CCTV फुटेजची तपासणी सुरू केली आहे. फॉरेन्सिक टीमकडूनही सखोल अहवालाची प्रतीक्षा आहे.
सोशल मीडियावर संताप
हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी ट्विशाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. #JusticeForTwisha हा हॅशटॅग ट्रेंड होत असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.
