पशुवैद्यकीय विभाग झाला जागा; त्वचा रोगग्रस्त कुत्र्यांचा प्रश्न मात्र कायम

रोगग्रस्त

बाळापूर (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील उरळ-बु. गावात मोकाट व त्वचारोगग्रस्त कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवी आरोग्याला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याबाबत ‘दै. अजिंक्य भारत’मध्ये ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा अखेर परिणाम दिसून आला आहे. या वृत्ताची दखल घेत पशुवैद्यकीय विभागाने रविवारी (दि. ४) सुटीच्या दिवशी तातडीने गावात धाव घेत लसीकरण मोहिमेला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त होत असला तरी, रोगग्रस्त कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.

उरळ-बु. परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या संख्येने मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला होता. यातील अनेक कुत्र्यांना खरूज, त्वचा खाज, जखमा व संसर्गजन्य आजार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. या कुत्र्यांच्या सततच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एका त्वचारोगग्रस्त कुत्र्याने गावातील एका महिलेला चावा घेतल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित महिलेला संसर्गाची लक्षणे जाणवू लागल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वारंवार आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संताप व्यक्त केला जात होता. अखेर ‘दै. अजिंक्य भारत’ने या विषयाकडे लक्ष वेधत सविस्तर वृत्त प्रकाशित केले आणि त्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रशासनाला जाग आली.

Related News

रविवारी सुटी असूनही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने उरळ गावात दाखल होत कारवाईला सुरुवात केली. या मोहिमेत गावातील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांनाही प्रतिबंधात्मक लसी टोचण्यात आल्या. लसीकरणामुळे रेबीजसह इतर संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होईल, असा दावा पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे. बातमीचा हा ‘इम्पॅक्ट’ पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, माध्यमांच्या भूमिकेचेही कौतुक केले जात आहे.

मात्र, या कारवाईबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे लसीकरण किती कुत्र्यांचे झाले, पुढील नियोजन काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्थानिक पातळीवर लसीकरणाची सुरुवात झाली असली तरी, उरळ परिसरातील रोगग्रस्त कुत्र्यांचा प्रश्न अद्याप कायम आहे. केवळ लसीकरण पुरेसे नसून, गंभीर आजाराने ग्रस्त कुत्र्यांवर उपचार करणे, गरज असल्यास त्यांचे पुनर्वसन किंवा निर्बंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. कुत्र्यांची वाढती संख्या भविष्यात आणखी मोठा आरोग्य प्रश्न निर्माण करू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात थेट लक्ष घालून दीर्घकालीन व ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

कोट :
“गावातील मोकाट कुत्र्यांना लसीकरण करण्यात आले, ही निश्चितच चांगली बाब आहे. मात्र, केवळ तात्पुरती कारवाई न करता जिल्हा पातळीवरून याची गंभीर दखल घेऊन रोगग्रस्त कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
गोपाल पोहरे (शेतकरी पुत्र, उरळ)

read also : https://ajinkyabharat.com/kamavar-gramsthancha-santap-of-the-underground-duct-in-the-malsur-bus-stand-complex/

Related News