VBA : वंचित आघाडीचा जलवा; प्रस्थापितांना दिला दणका, 3 महापालिकांत ‘निळं वादळ’

वंचित आघाडी

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने अनेक ठिकाणी आघाडी घेतली असली, तरी वंचित बहुजन आघाडीने (VBA) काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांना जबरदस्त धक्का दिला आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सोलापूर महापालिकांमध्ये वंचित आघाडीचं ‘निळं वादळ’ पाहायला मिळालं असून, स्वबळावर लढत देत वंचितने आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचं होमग्राऊंड मानल्या जाणाऱ्या अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडीने दमदार सुरुवात केली आहे. अकोला महानगरपालिका प्रभाग क्रमांक १४ मधून वंचित आघाडीचं संपूर्ण पॅनल विजयी झालं आहे. या पॅनलमध्ये जयश्रीताई महेंद्र बहादूरकर, पराग रामकृष्ण गवई आणि शेख समशू कमर शेख साबीर यांनी विजय मिळवला. याशिवाय अकोला महापालिका निवडणुकीत निलेश देव यांनी तब्बल १६०० मतांनी विजय संपादन केला आहे.
अकोला पालिकेतील वंचितचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत –

  1. उज्वलाताई प्रवीण पातोडे

    Related News

  2. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर

  3. पराग रामकृष्ण गवई

  4. शेख समशू कमर शेख साबीर

  5. निलेश देव

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एकीकडे भाजपने आघाडी घेतली असली, तरी वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवत ४ जागांवर विजय मिळवला आहे. मर्यादित संसाधनं, अल्प संघटनात्मक ताकद आणि मोठ्या पक्षांच्या दबावाखालीही वंचितने मिळवलेला हा विजय राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, काँग्रेस गट आणि देशमुख कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर महानगरपालिकेत वंचित आघाडीचा विजय सर्वाधिक चर्चेचा ठरला आहे. लातूरमध्ये बहुजन मतांची संख्या साधारणतः १२ टक्के असतानाही, वंचितच्या छताखाली मतदार एकवटले आणि पाचपैकी चार उमेदवार विजयी झाले. हा निकाल केवळ संख्याबळावर नव्हे, तर संघटित मतशक्तीवर मिळवलेला विजय असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

लातूरमधील वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

  • प्रभाग १३ अ : अमोल भाऊ लांडगे

  • प्रभाग क्रमांक ०४ अ : सचिन अर्जुन गायकवाड

  • प्रभाग क्रमांक ०७ अ : निकिता रोहित सोमवंशी

  • प्रभाग क्रमांक ०२ अ : वंचित आघाडीचे उमेदवार विजयी

सोलापूर महापालिकेतही वंचित आघाडीने उल्लेखनीय कामगिरी करत आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली आहे. एकूणच, या निकालांमुळे वंचित बहुजन आघाडी ही केवळ पर्यायाची राजकीय शक्ती नसून, काही भागांत निर्णायक ठरू शकते, हे स्पष्ट झालं आहे.

महापालिका निवडणुकांतील हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, वंचित आघाडीच्या ‘निळ्या राजकारणाचा’ प्रभाव आगामी काळात अधिक विस्तारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/bmc-election-result-2026-historic-victory-mumbai-mayor-kon-fadnavis-powerful-legislative-suspense-tokala/

Related News