अकोला – वणी वारुळा फाट्यावर एस टी बस थांबा असूनही परतवाडा, अकोला, अकोट आगारातील बसेस थांबत नसल्याचे गंभीर प्रमाणात आढळले आहे. या मार्गावर धावणाऱ्या बसेसचे चालक व वाहक प्रवाशांना वणी वारुळा फाट्यावर उतरण्याची परवानगी न देता, तिकीट देवरी फाटा किंवा अकोटवर फाडून बस थांबवतात. यामुळे स्थानिक रहिवासी व प्रवाशांना मोठा त्रास होत असून, त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.
नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या वतीने अकोला विभाग प्रमुख विलास राठोड यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, दि. ५ डिसेंबर रोजी बस क्र. एम एच ४० एक्यु ६४६७ आणि दि. ८ डिसेंबर रोजी बस क्र. एम एच ४० एक्यु ६३९९ या बसच्या चालकांनी वणी वारुळा फाट्यावर थांबण्यास नकार दिला, तसेच तक्रार करणाऱ्या मुलीला उद्धट व घाणेरडे शब्द वापरून धमकावले. महिला वाहक एम एन इंगळे यांनीही तिकीट पाडताना फाट्यावर थांबण्यास नकार दिला.
अकोला विभाग कार्यालयाने व अमरावती विभागीय एस टी कार्यालयाने वणी वारुळा फाट्यावर थांबा असल्याचे लेखी मान्य केले आहे. मात्र, प्रत्यक्षात चालक व वाहक बस थांबवत नसल्याने तक्रारी देण्याची वेळ आली. नारी शक्ती एकता संघर्ष फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी चेतावणी दिली आहे की, संबंधित चालक व वाहकांवर कारवाई न झाल्यास, ते अकोला विभाग प्रमुखांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करणार आहेत.
विभाग प्रमुख विलास राठोड यांनी या प्रकरणाची माहिती दिली आणि सांगितले की, ते दौऱ्यावर असल्यामुळे कार्यालयात परतल्यावर तक्रारींचा अभ्यास करून योग्य कारवाई केली जाईल.या तक्रारीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेची आणि बस सेवेच्या नियमांची गंभीर दखल घेणे आवश्यक ठरले आहे, तसेच एस टी चालक व वाहकांनी नियमांचे पालन न केल्यास प्रशासनात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
