वंचितनं निर्णय फिरवला, सांगलीत गणित बदलणार?

वंचितनं निर्णय फिरवला, सांगलीत गणित बदलणार?

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात आता नाट्यपूर्ण घडामोडी पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानं सांगलीत तिरंगी लढत होत आहे. सांगलीच्या निवडणूक आखाड्यात यंदा तीन पाटलांमध्ये लढत होत आहेत. महायुतीचे संजयकाका पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील विरुद्ध अपक्ष लढणारे विशाल पाटील यांच्यात सामना होत आहे.

विशाल पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी काँग्रेस नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा तिरंगी सामना होणार हे निश्चित झालं. गेल्या निवडणुकीत तिरंगी सामन्याचा फटका विशाल पाटलांना बसला होता. त्यावेळी विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरीकडून लढले होते. वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तब्बल ३ लाख मतं घेतली. विशाल पाटील १ लाख ६४ हजार ३५२ मतांनी पराभूत झाले.

सांगलीची जागा ठाकरे गटाला सुटल्यानं विशाल पाटलांची अडचण झाली. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी सांगलीचा प्रश्न दिल्लीपर्यंत नेला. पण पदरी निराशा पडली. त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला. गेल्या निवडणुकीत ज्या वंचितमुळे पाटलांचा पराभव झाला, त्याच वंचितनं आता पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सांगलीत राजकीय गणितं फिरु शकतात.

Related News

सांगलीतून ओबीजी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे निवडणूक रिंगणात आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना आधीच पाठिंबा दिला होता. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट होताच वंचितनं त्यांची भूमिका बदलली. विशाल पाटील अपक्ष लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, अशी घोषणा आंबेडकरांना केली. विशाल पाटील यांचे बंधू आणि सांगलीचे माजी खासदार प्रतीक पाटील यांनी आंबेडकर यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

नाट्यपूर्ण घडामोडींनंतर आता सांगलीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं प्रकाश शेंडगेंना दिलेला पाठिंबा काढला आहे. वंचितनं आता विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विशाल पाटलांचं बळ वाढलं आहे. मागील निवडणुकीत सांगलीत वंचितनं ३ लाख मतं घेतली होती. तर विशाल पाटलांना ३ लाख ४४ हजार ६४३ मतं मिळाली होती. त्यामुळे वंचितचा पाठिंबा विशाल पाटील यांच्यासाठी गेमचेंजर ठरु शकतो.

Related News