शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन व शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अकोला अंतर्गत अकोट तालुक्यातील लोहारी खुर्द येथे भव्य क्षेत्रीय दिन / किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, हरभरा पिकाचे लागवड तंत्रज्ञान, किड-रोग व्यवस्थापन, तसेच कीटकनाशक फवारणीपूर्व घ्यावयाच्या काळजीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
शनिवार, दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, लोहारी खु. (ता. अकोट) येथे हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाचे आयोजन प्रकल्प संचालक आत्मा अकोला डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प उपसंचालक आत्मा अकोला डॉ. प्रेमसिंग मारग, उपविभागीय कृषी अधिकारी अकोट तुषार ढंगारे, तसेच तालुका कृषी अधिकारी अकोट कु. अश्विनी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारी खु. गावच्या सरपंच सौ. पूजा प्रफुलराव म्हैसने या होत्या. प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर उप कृषी अधिकारी जी. बी. निगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत क्षेत्रीय दिन व किसान गोष्टी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष शेतात उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान पोहोचविणे, शाश्वत शेतीला चालना देणे आणि उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
Related News
हरभरा व रब्बी पिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन
कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथील शास्त्रज्ञ कुलदीप देशमुख (विषय विशेषज्ञ – कृषीविद्या) यांनी हरभरा तसेच रब्बी हंगामातील प्रमुख पिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले. हरभऱ्याची योग्य वाण निवड, पेरणीची योग्य वेळ, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच जमिनीच्या आरोग्याचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
हरभरा पिकातून अधिक उत्पादन घेण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे असून, शिफारस केलेल्या पद्धतींचे काटेकोर पालन केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, करडई यांसारख्या पिकांबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
किड-रोग व्यवस्थापन व कीटकनाशक फवारणीपूर्व काळजी
कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथील सहयोगी आनंद पाचरे यांनी हरभरा तसेच रब्बी हंगामातील पिकांवरील किड व रोग व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पिकांवर येणाऱ्या प्रमुख किडी, रोगांची लक्षणे, त्यांची ओळख आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती त्यांनी दिली.
कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या आवश्यक काळजीविषयी त्यांनी विशेष भर दिला. योग्य कीटकनाशकाची निवड, शिफारस केलेली मात्रा, फवारणीची योग्य वेळ, सुरक्षा साधनांचा वापर आणि पर्यावरण संरक्षण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. अनावश्यक व अति कीटकनाशक वापरामुळे होणारे दुष्परिणामही त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांची उत्तरे
कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या पिकांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. हरभऱ्यातील मर रोग, घाटे न येण्याची समस्या, उत्पादन घटण्याची कारणे, तसेच बाजारभाव यांसारख्या विषयांवर शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केल्या. तज्ज्ञांनी या सर्व प्रश्नांची सविस्तर व समाधानकारक उत्तरे देत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले.
विविध शासकीय योजनांची माहिती
जिल्हा खादी व ग्राम उद्योग मंडळ, अकोला येथील तांत्रिक अधिकारी आर. एम. बिलबिले यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये ग्रामीण रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार, प्रक्रिया उद्योग, तसेच खादी व ग्रामोद्योगाशी संबंधित योजनांचा समावेश होता.
यासोबतच त्यांनी मधुमक्षिका पालन या विषयावर सविस्तर माहिती दिली. मधुमक्षिकांच्या विविध जाती, मधुमक्षिका संगोपन पद्धती, तसेच पिकांच्या परागीभवनामध्ये मधुमक्षिकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मधुमक्षिका पालनातून शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न कसे मिळू शकते, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
कृषी विभागाच्या योजनांचा आढावा
तालुका कृषी अधिकारी अकोट कु. अश्विनी बिराजदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, शेतकरी उत्पादक गट व कंपन्या, अनुदानित यंत्रसामग्री योजना, माती परीक्षण आदी योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन आपली शेती अधिक फायदेशीर बनवावी, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी उत्पादक गटांचे अनुभव कथन
अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील शक्ती शेतकरी उत्पादक गटाचे सदस्य आकाश चांदणे यांनी गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सामूहिक शेती, उत्पादनाची विक्री, बाजारपेठेशी थेट संपर्क, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी गट कसा उपयुक्त ठरतो, याचे प्रत्यक्ष अनुभव त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडले.तसेच गावातील प्रगतशील शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीविषयक अनुभवांचे मनोगत व्यक्त करत इतर शेतकऱ्यांना प्रेरणा दिली.
मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमास अरुणभाऊ गावंडे (अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी), अतुलराव म्हैसने, सुधीर म्हैसने (पोलीस पाटील), सहाय्यक कृषी अधिकारी कु. नम्रता पुंडकर, दीपक सहारे, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत निवड झालेल्या कृषी सखी, शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, कृषी सेवा केंद्रांचे प्रतिनिधी तसेच लोहारी खु. व परिसरातील विविध गावांतील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रम समाप्तीनंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षांच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी जी. बी. निगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) राहुल अडाणी यांनी केले. त्यांनी कार्यक्रमातून मिळालेली माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन उपस्थितांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सखी सुमेधा विठ्ठल डोबाळे व हर्षाली उमेश ठाकरे यांनी विशेष सहकार्य केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राहुल अडाणी यांनी केले.शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपयुक्त ठरणारे मार्गदर्शन, तज्ज्ञांचा संवाद आणि योजनांची माहिती यामुळे हा किसान गोष्टी कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.
read also : https://ajinkyabharat.com/bihar-minister-nitin-nabin-is-the-new-national-working-president-of-bjp/
